महाराष्ट्र

Maharashtra : पावसाळी अधिवेशनात अकोल्यावर मंत्रिपदाची बरसात?

State Cabinet : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

Maharashtra Politics : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए मधील मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यात येत्या 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी माहिती आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात अकोला जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यास अकोला जिल्ह्यासाठी पूर्णवेळ पालकमंत्री मिळणार आहे.

लोकसभा निवडणूक संपली आणि देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे. ती राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची. महायुती सरकारमधील शिंदे गट आणि अजितदादा गट हे सातत्याने मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी करत होते. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास अकोला जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची आशा वाढली आहे. कारण तत्कालीन फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पाच वर्षे पूर्णवेळ डॉ. रणजीत पाटील यांच्या रूपाने अकोला जिल्ह्याला राज्यमंत्रीपद मिळाले होते.

डॉ. रणजीत पाटील यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गृह राज्यमंत्रीपदासह विविध महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी सोपवली होती. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळही त्यांच्याच गळ्यात पडली होती. ठाकरे सरकारमध्ये मात्र अकोला जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. दरम्यान शिंदे फडणवीस सरकारमध्ये तरी अकोला जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती. काही कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला होता. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या घटकपक्षांमधील नेत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या विस्तारत अकोला जिल्ह्याला स्थान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर मिळेल अकोला जिल्ह्याला मंत्रिपद!

नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत 45 प्लस चा नारा देणाऱ्या भाजपला राज्यात चांगलाच फटका बसला. खासकरून विदर्भात भाजपच्या जागा घटल्या. केवळ दोन जागेवर कमळ फुलले. त्यामध्ये अकोला आणि नागपूर या मतदारसंघाचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर ला मंत्रिपद मिळाले आहे. तर दुसरीकडे सलग पाचव्यांदा भाजपचा गड राखणाऱ्या अकोला जिल्ह्याला आता राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि वंचितला हरवत भाजपने हा मतदारसंघ राखला आहे.

RSS संघाच्या कार्यक्रमात अंबानींचे जावई आणि नाना पाटेकरांचा मुलगा

सावरकरांचे नाव आघाडीवर!

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये फेरबदला बरोबरच नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भाजपने लोकसभेची सीट राखल्याने भाजपची ताकद वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भरभरून यश मिळविण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. तर जिल्ह्याला विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिपद मिळाल्यास त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. लोकसभेची सीट राखण्यासाठी अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्यात जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यास रणधीर सावरकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!