Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. त्यापूर्वी कोण निवडून येणार याचे एक्झिट पोल आले आहेत. जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे आघाडीवर दाखवण्यात आले आहेत. दुसरीकडे अकोला लोकसभा मतदारसंघात पक्षांचे दावे-प्रतिदावे समोर येत आहेत. या मतदारसंघात नेमके कोण बाजी मारणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे आता साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. 4 जूनला निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील अकोला मतदारसंघात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा मतदारसंघात पणाला लागली आहे.
तिहेरी लढत
अकोला मतदारसंघात भाजपकडून अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात कोण खासदार होणार, हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे. तरी त्यापूर्वी येणाऱ्या एक्झिट पोलने चिंता वाढवली आहे. अकोल्यातील लोकसभा निवडणुकीत मतदान हे 61.79 टक्के झाले. अकोल्यात एकूण मतदारांची संख्या 18 लाख 75 हजार 663 आहे.
भाजपला फायदा
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती असल्याने भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, यावेळी शिवसेना ठाकरे गट हा भाजपसोबत नाही. त्यामुळे याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अकोल्यात शिंदे गट आणि अजित पवार गटाची राजकीय शक्ती सिद्ध झालेली नाही. मागील निवडणुकीसारखीच तिरंगी लढत दिसली.
गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि ‘वंचित’च्या पारंपरिक मतांचे विभाजन झाले. त्याचा मोठा फायदा भाजपला झाला. यंदा काही वेगळं चित्र पाहायला मिळाले. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीकडून नवखे उमेदवार निवडणुकीत उभे होते. त्यामुळे नेमक्या निकालाचे अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
अकोल्यात एक्झिट पोलचे अंदाजही समोर आले आहेत. एबीपी सी-व्होटरच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर आहेत. काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर आहेत. अंदाज काहीही असले तरी पक्षाकडून आणि उमेदवारांकडून दावे प्रतिदावे होताना दिसत आहेत. त्यामुळे कोणते अंदाज नेमके खरे ठरतात हे पहावे लागणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांनी बाजी मारली होती. धोत्रे यांना 5 लाख 54 हजार 444 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडरांना 2 लाख 78 हजार 848 मते मिळाली. काँग्रेसचे हिदायत पटेल यांना 2 लाख 54 हजार 370 मते मिळाली होती.
Vijay Wadettiwar : एनडीए आघाडीचा पराभव, तर इंडिया आघाडीचा ‘विजय’
चुरस वाढली
भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी समाज माध्यमाशी बोलताना विजयाचा दावा केला. या निवडणुकीत भाजप राज्यात 45 प्लस असेल असेही ते म्हणाले. अकोल्यातही ‘एक्झिट पोल’ भाजपकडे पॉझिटिव्ह दाखवले. राज्यातही हीच परिस्थिती असणार असेही ते म्हणाले. काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांनीही विजयाचा दावा केला. देशात परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होणार. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारणार असल्याचे त्यांनी म्हटले.
महाराष्ट्र आणि देशात परिवर्तनाची लाट असेल. महाराष्ट्रातील तोडफोड जनतेला रुचलेली नाही. त्याचा फटका महायुतीला राज्यात बसेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 28 पेक्षा जास्त जागा मिळतील. असा दावाही अभय पाटील यांनी केला. शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात परिणामकारक झाल्याचे चित्र निकालातून दिसेल, असेही ते म्हणाले.