महाराष्ट्र सरकारच्या कर्मचारी भरतीच्या परीक्षा आणि त्यामध्ये घोळ होणे, हे जणू एक समीकरणच झाले आहे. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय नागपूरच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी परीक्षा सुरू आहे. यामध्ये प्रशासनाने मोठा घोळ घालून ठेवला आहे. अनेकांना परीक्षेपासून वंचित रहावे लागत आहे.
Group D अर्थात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीची जाहिरात सरकारने जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित केली होती. GMCच्या (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय नागपूर) 680 जागांसाठी ही जाहिरात होती. यासाठी तब्बल 65 हजार उमेदवारांनी अर्ज भरले. अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी 900 रुपये, तर इतरांसाठी 1000 रुपये शुल्क होते. नागपूरच्या उमेदवारांनी अर्ज भरताना परीक्षा देण्यासाठी ‘नागपूर केंद्र’ असा स्पष्ट उल्लेख केलेला असताना त्यांना मराठवाड्यातील नांदेड, परभणीसारखे केंद्र देण्यात आले.
नागपुरातील उमेदवारांना मराठवाड्यातील केंद्र
रुग्णालय नागपुरात आणि अर्ज भरणारेही नागपुरातील असताना त्यांचे परीक्षा केंद्र नागपूर असणे स्वाभाविक होते. पण असे झाले नाही. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. नागपुरातून नांदेड आणि परभणीसारख्या ठिकाणी जाण्यासाठी या लोकांचे कमित कमी २000 ते 3000 रुपये खर्च होणार आहेत. अनेकांची येवढी परिस्थिती नाही. परिणामी अशा उमेदवारांना परीक्षेपासून मुकावे लागत आहे, असे काही परीक्षार्थींनी ‘द लोकहित’शी बोलताना सांगितले.
परीक्षा हे सरकारच्या कमाईचे साधन
GMCमध्ये 1100 जागा रिक्त असल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही केवळ 680 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. उर्वरित जागांचे काय, याचे कुठलेही उत्तर नाही. 65 हजारमधून केवळ 680 जागा भरल्या जातील. त्यानंतर पुन्हा उर्वरित रिक्त जागा भरण्यासाठी सरकार पुढाकार घेईलही. तेव्हा या टप्प्यातील जे लोक लागले नाहीत, ते पुन्हा अर्ज भरतील. यामध्ये अर्ज शुल्काच्या नावाखाली सरकारची पुन्हा कमाई होईल. त्यासाठीच हा प्रकार केला जात असल्याचा आरोपही परीक्षार्थ्यांनी केला आहे.
डिसेंबर 2023मध्येही झाला होता गोंधळ
चतुर्थ श्रेणी कर्मचारी वॉर्ड बॉय, रुग्णांची ने-आण करणे आदी कामे करतात. डिसेंबर 2023 मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी नसल्यावरून GMCमध्ये मोठा हंगामा झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी GMCला भेटी दिल्या होत्या. त्यानंतर रिक्त जागा भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तेव्हा कुठे ती परिस्थिती निवळली होती. त्यानंतर आत्ता कुठे त्या जागा भरण्यासाठी परीक्षा सुरू आहेत आणि त्यातही प्रशासनाने घोळ घालून ठेवला आहे.
विवाहित महिलांना नाही देता आली परीक्षा
जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर काही मुलींचे लग्न झाले. त्यानंतर त्यांचे नाव बदलले. अशा उमेदवारांनी लग्नाच्या आधीचे नाव आणि नंतरचे नाव या दोन्हींच्या पुराव्यांच्या प्रति सोबत आणल्या होत्या. पण अशा महिलांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. नागपुरातील एमआयडीसी वाडी परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षा देण्यास मज्जाव केला. अशा शेकडो महिलांना परीक्षा न देताच परत जावे लागले. या महिलांची संख्या शेकडोंची असल्याचे सांगितले जाते. महिलांनी GMC व्यवस्थापनाच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली.