Tumsar Np Issue : तुमसर नगरपालिकेच्या एका माजी नगरसेवकाने एका महिला कर्मचा-याशी असभ्य वर्तणूक केल्याचा आरोप आहे. मात्र, कर्मचारी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.हे प्रकरण खूप तापले आहे.
कर्मचारी गायब का राहतात हे विचारायला माजी नगरसेवक गेले होते. परंतु त्यांना आता कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. माजी नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर नेहमीच नगरपालिका कार्यालयात मध्यान्ह सुट्टीच्या वेळी येतात. कर्मचारी कुठे गेले, काय करतात, अशी विचारणा करून महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देतात. तसेच दहशत निर्माण करीत असल्याची तक्रार नगर परिषद कर्मचारी संघटनेने मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ठाकूर हे नेहमीच मध्यान्ह सुट्टीत नगरपालिका कार्यालय गाठतात. तिथे येऊन महिला कर्मचाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. ठाकूर यांनी सांगितलेले काम केले नाही, तर द्विअर्थी शब्दांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देतात. परिणामी कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो, असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी 30 एप्रिल रोजी दुपारी कार्यालयात येऊन त्यांनी कर्मचाऱ्यासोबत वाद घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर नाईलाजास्तव कर्मचारी काम बंद आंदोलन करतील, असा इशारा कर्मचारी संघटनेने निवेदनात दिला आहे.
Mohadi Nagar Panchayat : मोहाडी नगर पंचायतीत पाच लाखांचा घोटाळा?
माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न
दरम्यान, याबाबत द लोकहितने माजी नगरसेवक मेहताब ठाकूर यांच्याकडून माहिती घेतली. ते म्हणाले, घटनेच्या दिवशी घर टॅक्स भरायला आलेल्या महिलेला नगर परिषदेतील कर्मचाऱ्याने ओरडून माझ्यासमोर अपमानित केले. त्याची तोंडी तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. त्याचाच राग मनात ठेवून माझी प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने महिला कर्मचाऱ्यांशी अभद्र व्यवहार केल्याचा आरोप आहे. पालिकेतील महिला विभागाशी आपला संबंधच येत नाही,असा खुलासा केला आहे.त्यामुळे हे प्रकरण आता काय वेगळे वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.