Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक संपूर्ण देशात 1 जून रोजी पार पडली आहे. निकालासाठी आता केवळ तीन दिवस उरले आहेत. नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे अकोल्यात धोत्रे, आंबेडकर की पाटील, अबकी बार.. नेमकं कोण होणार खासदार, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. निवडणुकीचा निकाल शुक्रवार, 4 जून रोजी जाहीर होणार आहे. याकरिता निवडणूक विभागातर्फे एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात तयारी पूर्ण झाली आहे.
26 एप्रिलला लोकसभा अकोला मतदारसंघाकरिता निवडणूक पार पडली. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीचे कार्य सुरू होईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता स्वतंत्र मतमोजणीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, सलग तीनवेळा भाजपचा खासदार असलेल्या या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
16 मार्च रोजी देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक सात टप्प्यात जाहीर केली होती. त्यानुसार 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक सुरू झाली. आता या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. महाराष्ट्रातही 5 टप्प्यांत निवडणूक पार पडली आहे. चवथ्या टप्प्यात अकोला मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान झाले. आता निकालाला अवघा तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत देखील काट्याची तिरंगी लढत पाहायला मिळाली. महाविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील, महायुतीकडून खासदार संजय धोत्रेंचे सुपुत्र अनुप धोत्रे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्यात ही लढत झाली. तिघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात नेमका कुणाचा विजय होईल, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत. मात्र निश्चित अंदाज कोणीच सांगू शकत नसल्याचं बोललं जातं आहे. कारण तिघांमध्ये अतिशय काट्याची लढत झाली आहे.
पूर्वी काँग्रेस आणि वंचित मधील मतविभाजन हे थेट भाजप उमेदवाराच्या पथ्यावर पडायचे. मात्र आता भाजपकडून यावर्षी उमेदवार बदलला, त्यात काँग्रेस कडुन मराठा कार्ड वापरण्यात आले. तर दुसरीकडे वंचितकडून ही निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली होती. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडुनही सोशल इंजिनियरिंगवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमका विजय कुणाचा ? पाटील, धोत्रे की आंबेडकर याचे अंदाज बांधण्यात येत आहेत.
28 फेरीनंतर येणार निकाल!
4 जूनच्या निकालासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. अकोला लोकसभा मतदार संघाच्या मतदानाची मतमोजणी ही महाराष्ट्र वखार महामंडळ, एमआयडीसी फेज-4, शिवणी, अकोला येथील मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. त्याकरीता विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय मतमोजणी कक्ष निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाचा निकाल 28 फेऱ्यांनंतर स्पष्ट होईल. विधानसभानिहाय मतमोजणी होणार असून, सर्वाधिक 28 फेऱ्या या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात होतील, तर सर्वांत कमी 22 फेऱ्या या अकोला पश्चिममध्ये होणार आहेत. मतदारसंघाच्या मतमोजणीकरिता एकूण 100 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात सहा विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी 14 टेबल अशा एकूण 84 टेबलवर प्रत्यक्ष मतमोजणी चालणार आहे. पोस्टल बॅलेटच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था असून, त्यासाठी 26 टेबल आहेत. प्रत्येक टेबलसाठी एक काऊंटिंग सुपरवायझर, एक असिस्टंट आणि एक मायक्रो ऑब्जर्व्हर राहतील. यासोबतच उमेदवारांचे प्रतिनिधीसुद्धा असतील
पोलीस बंदोबस्त
निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार मतमोजणीचे अनुषंगाने मतमोजणी केंद्रावर त्रीस्तरीय सुरक्षा व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या 100 मिटर परिसराबाहेर जिल्हा पोलीस अधिक्षक, अकोला यांचेकडील पोलीस अधिकारी/कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 100 मिटर परिसरामध्ये राज्य राखीव पोलीस दल तसेच मतमोजणी केंद्राभोवती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी अतिरिक्त पोलीस अधिक्षक-1, पोलीस उप अधिक्षक-1, पोलीस निरिक्षक-16 यांचेसह एकूण 568 पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची बंदोबस्ताकरीता नियुक्ती करण्यात आली आहे.