Maharashtra Politics : एखाद्या क्षणी एखाद्या विषयात जास्त मार्क मिळाले, तर तो व्यक्ती गुणवंत होत नाही. आज देशभर भारतीय जनता पक्षाला, एनडीएला जनादेश आहे. 24 कोटी मतदारांनी मोदींना तिसऱ्यांदा निवडून दिले. ज्यांनी स्वतः 10 जागा लढवून 8 खासदार आले, ते आता मोदींशी लढण्याची भाषा करत आहेत, हा 21व्या शतकातला सर्वात मोठा जोक आहे, असे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मुंबई येथे काल (ता. 15) आयोजित पत्रकार परिषेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, ज्या मोदींच्या नेतृत्वात 240 जागा जिंकल्या. काँग्रेसच्या 2014 च्या 44 जागा, 2019 च्या 52 जागा आणि आता 99 जागा. तिन्ही निवडणुकांमधली बेरीज केली तरी 240 होत नाही. शरद पवारांनी एक स्वप्न बघत सर्व राजकीय पक्ष एकत्र केले. कशासाठी, तर त्यांना किंवा त्यांच्यापैकी कुणालातरी पंतप्रधान होता आलं पाहिजे. पण सर्व पक्ष एकत्र येऊनही पाहिजे तेवढ्या जागा ते प्राप्त करू शकले नाहीत.
जय पराजय याच्या बाहेर जाऊन ज्यांना आपल्याला सहकार्य केलं, त्यांना धन्यवाद देणं हे आपलं कर्तव्यच आहे. पण या धन्यवाद सभेतून, पत्रकार परिषदेतून मोदींच्या विजयाला कमी लेखण्याचा प्रयत्न 8 खासदारांचे नेतृत्वा कडून होणे म्हणजे ‘सात अजुबे इस दुनिया में.. अन् आठवा अजुबा म्हणजे हा प्रकार आहे’, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
नॅरेटिव्ह देशभक्तीचे, देशसेवेचे
दुसऱ्यांना नॅरेटीव्ह सेट करता, असं म्हणणाऱ्या भाजपने 400 पार आणि मंगळसुत्राचे नॅरेटिव्ह केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यावर आम्ही केलेले नॅरेटिव्ह देशभक्तीचे, देशसेवेचे होते. देशाला तिसऱ्या क्रमांकाची एकॉनॉमी करण्याचे होते. पण त्यांना संविधान बदलले जाईल, आरक्षण रद्द केले जाईल, अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट केले. मायावी रुप घेऊन लोकांना भ्रमित करण्याचे प्रयत्न केले. याचे उत्तर त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिळणार आहे.
ससा आणि कासवाच्या शर्यतीत कासव एकदाच जिंकला. ससा मात्र नेहमीच जिंकत आला आहे. आजही 128 विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही पुढे आहोत. त्यांच्या 160 विधानसभा मतदारसंघांपैकी अगदी बॉर्डरवर असणाऱ्या 37 विधानसभा आहेत. तिथेही आमच्या कार्यकर्त्यांनी कष्ट केल्यानंतर महायुतीचंच सरकार येईल, हे स्पष्ट आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.