भंडारा जिल्ह्यात गौरी-गणपती उत्सवातही 2.43 लाख लाभार्थी आनंदाच्या शिधेपासून अद्यापही वंचित आहेत. वेळेवर पुरवठा न झाल्याने शिधेच्या ‘आनंदा’मध्ये पुरवठ्याचे ‘विघ्न’ निर्माण केल्याचे बोलले जात आहे. सरकारने सर्वसामान्य नागरिकांना गोडधोड खाऊन सण साजरा करता यावा, यासाठी 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वाटण्याची घोषणा केली होती. दरम्यान गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मात्र, पूर्ण साहित्याचा पुरवठा झालाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 2 लाख 43 हजार 616 लाभार्थी शिध्याच्या आनंदापासून वंचित राहिले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आनंदाचा ‘शिधा’ देण्याची घोषणा केली होती. परंतु, गुढीपाडव्याच्या चुकलेल्या मुहूर्ताप्रमाणे गौरी-गणपतीमध्येही लाभार्थ्यांची निराशा झाली. जिल्ह्यातील 2 लाख 43 हजार 616 लाभार्थी कुटुंब आनंदाचा शिधाकरिता पात्र आहेत. या शिधाधारकांना प्रत्येकी 1 किलो साखर, चना डाळ, रवा तसेच 1 लिटर पामतेल असे 4 जिन्नस दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील एकूण 2 लाख 43 हजार 616 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा प्राप्त होणार आहे. परंतु, एकत्रित दिल्या जाणाऱ्या या किटमधील काही जिन्नस पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले नाहीत.
अशी आहे लाभार्थी संख्या
त्यामुळे आनंदाच्या शिधाकिटचे वितरण स्वस्त धान्य दुकानातून होऊ शकले नाही. भंडारा जिल्ह्यात एकूण 889 स्वस्त धान्य दुकानांद्वारे आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल. त्यामध्ये भंडारा तालुक्यात 173 (50500), लाखांदूर- 96 (26500), लाखनी-108 (27616), मोहाडी-111 (34000), पवनी-113 (33300), साकोली-105 (26400), तुमसर- 163 (45300) अशी तालुकानिहाय स्वस्त धान्य दुकाने व लाभार्थी संख्या आहे.
सणासुदीच्या व उत्सवाच्या निमित्ताने आनंदाचा शिधा दिला जात असला, तरी दरवेळी त्याची वेळ चुकत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे दरवेळी होणाऱ्या फसगतीमुळे या शिध्याच्या भरवशावर सण साजरा करण्यावर अवलंबून राहणे लाभार्थ्यांना परवडणारे नाही. दरवेळी वितरणात काहीतरी खोळंबा निर्माण होतो. ही योजना गोरगरिबांसाठी दिलासादायक असली तरी वेळेत लाभ न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकदा सण संपल्यानंतर शिधा वाटप केला जातो.
भंडारा जिल्ह्यात 2 लाख 43 हजार 616 लाख लाभार्थ्यांसाठी किटची मागणी करण्यात आली होती. परंतु किटमध्ये असणाऱ्या 4 जिन्नसपैकी काही साहित्यांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे अद्याप एकाही स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणि किटचेही वाटप सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे याला आनंदाचा शिधा म्हणायचा की दुःखाचा, हा सवाल भंडारावासी विचारत आहेत.