Political News : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे विजयी झाले. मात्र, या लोकसभेतील बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा आणि मेहकर या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील आमदार असूनही येथून जाधव यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट देताना या लोकसभा निवडणुकीत संबंधित विधानसभा क्षेत्रातील मताधिक्क्याचे निकष लावले जाणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे जाधवांच्या विजयानंतरही विद्यमान आमदारांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील चार आमदारांचा समावेश असल्याची देखील चर्चा जोरात आहे.
उमेदवारांना धोबीपछाड..
बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत खासदर प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड दिली. निवडणूक विजयाचे तंत्र अवगत असलेल्या खासदार जाधवांनी शांतीत क्रांती केली. या निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्य घसरले असले तरी लोकशाहीत एका मताने का होईना विजय हा विजयच असतो. अनेक मुरब्बी नेत्यांना पराभवाची चव चाखायला लावणाऱ्या या निवडणुकीत खासदार जाधव यांनी दणक्यात विजय मिळवला. त्यामुळे खासदार जाधव यांचे शिवसेनेत आणि केंद्रातही चांगलेच वजन वाढले आहे. त्यासाठी त्यांना मंत्रीपदाची शाब्बासकी मिळण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने आमदारांना आपापल्या मतदार संघात महायुतीच्या उम्मेदवाराला मताधिक्य मिळवून देण्याचे टार्गेट दिले होते. लीड नाही तर विधानसभेचे तिकीट ही नाही, अशा तोंडी सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहिल्यास खासदार जाधव यांची घाटावरच्या तीन मतदारसंघात झालेली माघार आणि होमग्राउंड असलेल्या मेहकर मतदारसंघात 243 मतांची निसटती आघाडी ही घाटावरील महायुतीमधील चारही आमदारांसाठी घातक मानली जात आहे.
सिंदखेड राजा मतदारसंघात राहस्त्रवाडी अजित पवार गटाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, चिखली मतदार संघात भाजपच्या आमदार श्वेता महाले, बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, तर मेहकरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर हे सपशेल अपयशी ठरलेत. आता याचा परिणाम काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर झाला तर ती घाटावरच्या चारही आमदरांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
मागील लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांनी सहा पैकी सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती. चिखली आणि बुलढाणा विधानसभेत त्यावेळी भाजप-शिवसेनेचे आमदार नसताना देखील चिखलीत 23861 आणि बुलडाणा विधानसभेत 25793 मतांची आघाडी घेतली होती. मात्र यावेळी चिखलीत श्वेता महाले आणि बुलढाण्यात संजय गायकवाड आमदार असताना देखील आघाडी मिळाली नाही.
डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन
होमग्राउंड असल्याने नरेंद्र खेडेकरांना चिखली विधानसभेत 11 हजार 920 तर आमदार गायकवाडांच्या बुलढाणा विधानसभेत २ हजार 255 मतांची आघाडी मिळाली. 2019 च्या निवडणुकीत खासदार जाधव यांच्यासमोर डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे आव्हान होते. त्यावेळी डॉ. शिंगणेंच्या सिंदखेडराजा मतदारसंघात जाधव यांनी 5992 मतांची आघाडी घेतली होती. यावेळी डॉ.शिंगणे हे प्रतापराव जाधवांच्या प्रचाराची धुरा सांभाळून होते. मात्र स्वतःच्या मतदारसंघात जाधव यांना मताधिक्य देण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे अपयशी ठरले. या सर्व आमदारांना विधानसभा निवडणुकीत तगडे आव्हान देणारा उमेदवार मिळाल्यास त्यांची अडचण होऊ शकते, अशी देखील चर्चा आहे.