Nagpur ZP : आमदार व खासदार निधीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांनाही विकास कामांसाठी निधी मिळत असतो. यावेळी या निधीला कात्री लागण्याची दाट शक्यता आहे. सद्यःस्थितीत एका सदस्याचे पद रद्द झाले आहे आणि आणि दुसऱ्या एकाचे सदस्यत्व रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या सदस्यांचा निधी इतरत्र वळता होण्याचीही शक्यता आहे.
17 सामूहिक विकास निधी अंतर्गत वर्ष 2024-25 मध्ये 7 कोटी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 58 सदस्यांना गृहीत धरून साधारणतः 12 लाख 50 हजार रुपये येतील, अशी तरतूद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षातील दायित्व मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. हे दायित्व साडे 5 ते 6 कोटीच्या घरात आहे. यंदाच्या वर्षातील निधीतून हे दायित्व कमी करण्यावर भर आहे. त्यामुळे यंदा सदस्यांना हा निधी कमी मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या कामांची देयके आधी देण्यात येत आहे. त्यानंतर उर्वरित निधीचा अंदाज घेता नवीन कामांना मंजुरी मिळण्याची चर्चा आहे. याचा थेट फटका सदस्यांना बसणार आहे. 17 सामूहिक विकास निधी अंतर्गत सदस्यांनी सुचविलेली कामे कमी होतील, अशीही चर्चा होत आहे. प्रशासनात वजन नसलेल्या सदस्यांना याची झळ जास्त बसेल, असे बोलल्या जात आहे.
Lok Sabha Election : येथील मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन ‘बॅलेट’ युनिट !
जुने सोडून नवीन कामांना प्रथम मंजुरी..
माहितीनुसार वर्ष 2022-23, 2023-24 मध्ये तरतूद निधीच्या तुलनेत जादाची कामे मंजूर करण्यात आली. त्या कामांना मंजुरी देऊन आता देयके देण्यात येत आहे. परंतु एका विभागातून जुन्या कामांना प्रथम मंजुरी न देता त्यानंतरच्या कामांना मंजुरी देत देयके मिळण्यासाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात येत असल्याचे समजते. हा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे.
एकाचे सदस्यत्व रद्द..
इसासनी- डिगडोह नगर परिषद झाल्याने एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले. तर माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे सदस्यत्व सध्यातरी धोक्यात आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा निधी इतरत्र वळता होईल, अशी चर्चा आहे.