Power Game : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र तीनही वीज कंपन्यांना महायुती सरकारने वेतनवाढीचे गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahatransco) या तीनही वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ देण्यात आली आहे. याशिवाय सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Legislative Monsoon Session) सध्या सुरू आहे. अधिवेशन काळात सरकारने घोषणाचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. अशात विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक कर्मचारी संघटना आपापल्या पदरात वेगवेगळे लाभ पाडून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नात वीज कंपनीतील कर्मचारी संघटनांना यश आले आहे. तीनही वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे रविवारी (ता. सात) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devednra Fadnavis) उपस्थित होते.
निवडणुकीपूर्वी ऊर्जा
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तीनही वीज कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ केली जाईल. याशिवाय सर्व भत्ते देखील 25 टक्के वाढ करून मिळतील. तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा 500 रुपयाचा भत्ता वाढवून एक हजार रूपये करण्यात आला.
सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांना खुश करून ऊर्जा मिळविली आहे.
फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय (Managing Director) संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार आणि या तीनही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.