Cabinet : मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे छगन भुजबळ कमालीचे संतापले आहेत. त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले असून आता त्यांच्या समर्थकांनी आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. पुण्यात तर त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील केले. भुजबळांनी अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसला तरीही त्यांनी अजित पवारांना घाम फोडला आहे, हे मात्र नक्की. आता तर त्यांनी अजित पवारांना थेट सवाल केला आहे.
अजित पवार यांनी ज्येष्ठत्वाच्या मुद्यावरून भुजबळांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवले आहे, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच दिले होते. नव्या चेहऱ्यांचे आणि तरुण मंत्रिमंडळ असेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार अजित पवार यांनी पहिला वार छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावरच केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी हा मोठा धक्का होता. भुजबळ मंत्रिमंडळाच्या बाहेर असतील, याचा कुणी विचारही केला नव्हता. विशेष म्हणजे आतापर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना प्रत्येकवेळी भुजबळ मंत्रिमंडळात होते. अगदी महायुतीत देखील ते कॅबिनेट मंत्री होते.
शरद पवार ..
त्यातल्या त्यात शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत येणाऱ्यांमध्ये छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील ही दोन नावं धक्कादायक मानली जात होती. दोघेही शरद पवारांचे अत्यंत जवळचे. मात्र तरीही सत्तेसाठी शरद पवारांची साथ सोडली. त्यांनी सत्तेसाठी ही लाचारी केल्याचे आरोपही झाले. मात्र, विकासासाठी भाजपसोबत गेल्याचे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले होते. अशा परिस्थितीत भुजबळांनाच मंत्रिमंडळापासून लांब ठेवल्यामुळे ते कमालीचे संतापले आहेत. त्यांनी अजित पवारांच्या विरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे.
मुंबईत झालेल्या ओबीसी बहुजन आघाडीच्या बैठकीत तर त्यांनी अजित पवारांनी थेट वयावरूनच डिवचले. त्यांना तरुणांना संधी द्यायची होती. पण तरुण म्हणजे किती वयाचा? तुमचे वय काय आहे? माझ्यासारखे तुम्ही पण जुने आहात. 67-68 वय म्हणजे तरुण म्हणायचे का? असा थेट सवाल यांनी अजित पवारांना केला आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांचाही उल्लेख करून अजितदादांना डिवचले. ते म्हणाले, ‘वयाचं काय घेऊन बसलात. तिकडे परभणी आणि बीडमध्ये तर तुमच्या आधी शरद पवार पोहोचले.’
आता विधानसभेचा राजीनामा देऊ का?
लोकसभा, राज्यसभेत जाण्यासाठी मी इच्छुक होतो. मी तिथे जाणं म्हणजे थांबण्यासारखच होतं. पण म्हणाले, नाही तुम्ही विधानसभा लढा. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. मी लढलो, जिंकलो आणि आता मंत्रिमंडळापासूनच लांब ठेवले. आता म्हणतात भुजबळांसाठी राज्यसभेचा विचार करतोय. म्हणजे विधानसभेचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाऊ का? याला काय अर्थ आहे?, असा सवालही त्यांनी केला.