Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 4 ऑक्टोबरला मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अडीच तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान आंदोलक आंदोलनावर ठाम असल्यानं पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यापूर्वीही अकोला येथील कृषी विद्यापीठ प्रवेशद्वारावर उपोषण आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र पुन्हा मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. अकोल्यातील वणी रंभापुर फाट्यावर 4 ऑक्टोबर रोजी मजुरांनी एकत्र येत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी प्रकल्पग्रस्त रोजंदारी मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आंदोलनात शेकडो मजूर सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते रवी राठी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं.
आश्वासनाचं काय झालं?
यापूर्वी मजुरांनी अन्न त्याग आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलं असल्याचं मजुरांनी सांगितलं. मात्र मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावरही यावर कोणताच तोडगा निघाला नसल्याचा आरोप करीत शेकडो शेतमजुरांनी हा रस्ता रोको आंदोलन पुकारलं होतं.
Charan Waghmare : लाडक्या बहिणींसाठी अश्लील भाषा; कारवाई कधी?
बारमाबी काम मिळावे
विद्यापीठाच्या प्रत्येक विभागावर मजुरांना 12 माही काम देण्यात यावे, शासनाने बंद केलेली कंत्राटी पध्दत बंद करण्यात यावी. किमान वेतन आयोगाप्रमाणे अस्थाई रोजंदार मजुरांच्या सन-2014 च्या शासकीय नियमानुसार वेतनामध्ये वाढ करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. महामार्गाच्या दोन्ही बाजूने मजुरांनी रस्ता जाम केला होता. दरम्यान या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या. दोन तास चाललेल्या या आंदोलनात पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. सौम्य लाठी चार्ज करुन आंदोलन मोडून काढले. पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी राज्यसरकारने दडपशाही करून हा आंदोलन मोडून काढला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.