महाराष्ट्र

Nana Patole : निवडणुका संपल्या, आता दुष्काळाचं काय ते बघा !

Maharashtra Government : सरकार कुरघोड्या अन् पक्ष फोडण्यातच गुंग.

Nana Patole : संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण टंचाईचा सामना करत आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. आता राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

आज (ता. २२) मुंबईत बोलताना नाना पटोले म्हणाले, धरणातील पाणीसाठा जेमतेम आहे. हजारो गावांना, वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाई असलेल्या प्रत्येक गावखेड्यांत पिण्याचे पाणी मिळावे. जनावरांना चारा उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी आचारसंहिता शिथिल करुन तातडीने पिण्याचे पाणी व जनावरांना चारा मिळेल, यासाठी सरकारने निर्णय घ्यावेत.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी माता भगिनी भर उन्हात वणवण करत आहेत. जनावरांना चारा नाही.

अनेक शहरांत 10-12 दिवसांतून एकदा पाणी येते. राज्यातील 23 जिल्ह्यांत पाण्याची भीषण टंचाई आहे. मराठवाड्यातील परिस्थिती तर अत्यंत गंभीर आहे. चारा नसल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

Pune Hit and Run : पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम घोळ केला !   

सरकार आपसी कुरघोड्यांत व्यस्त..

राज्याला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलावीत, हे आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितले होते. पण राज्यातील भाजपा-शिंदे-अजित पवार यांचे सरकार आपसातील कुरघोड्या व दुसरे पक्ष फोडणे यातच व्यस्त असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही.

वाट कशाची?

लोकसभा निवडणुकीमुळे शासन व प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिले. आता राज्यातील निवडणूक कार्यक्रम संपला आहे. राज्य सरकारने तातडीने पाणी व चाऱ्याची सोय करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात 45 दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगत आहेत. चारा उपलब्ध असेल तर मग चारा छावण्या सुरु करण्यासाठी महाभ्रष्टयुती सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहे, असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला.

राज्यात तातडीने चारा छावण्या सुरु केल्या पाहिजेत. अवकाळी पावसाच्या तडाख्याने आधीच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता दुष्काळाचे संकट ओढवले आहे. शेतकरी चारी बाजूनी संकटाने घेरला गेला आहे. त्याला आधार देण्याची गरज आहे. सरकारने तातडीने उपयायोजना कराव्यात, असेही नाना पटोले म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!