Assembly Election : उद्धव ठाकरे यांची सोमवारी दुपारी वणी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा झाली. या सभेसाठी उद्धव ठाकरे खास हेलिकॉप्टरने वणीत दाखल झालेत. ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार त्यांच्या बॅगांची तपासणी केली. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ स्वत: उद्धव ठाकरे यांनी रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला. बॅग्जची तपासणी करताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मोदी-शाह यांच्या बॅग्जची तपासणी करण्याचाही सल्ला दिला.
सोमवारी (11 नोव्हेंबर) दुपारी वणी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा झाली. उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर वणी येथील हेलिपॅडवर लॅन्ड झाले. हेलिकॉप्टर वणीत उतरल्यानंतर नियमाप्रमाणे निवडणूक विभागाचे अधिकारी हेलिपॅडवर पोहोचले. अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टरमधील बॅग आणि साहित्याची तपासणी करायची असल्याचं सांगितलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या घटनेचं व्हिडीओ चित्रीकरण केलं. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बॅगाही तपासा असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला.
ठाकरे म्हणाले..
उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांशी बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबाबत बोलताना दिसले. अधिकाऱ्यांनी ठाकरे यांना आपलं ओळखपत्र दाखविलं. अधिकाऱ्यांचं ओळखपत्र पाहिल्यानंतर ठाकरे काहीसे संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्नही विचारले. अधिकाऱ्याला नाव विचारल्यानंतर त्यांनी अमोल वाके असं सांगितलं. वाके अमरावतीचे राहणारे आहेत. वणीत नियुक्ती झाल्यानंतर पहिला दौरा उद्धव ठाकरे यांचा ठरला. त्यामुळं आपण पहिली तपासणी त्यांच्याच हेलिकॉप्टरची करीत असल्याचं वाके यांनी सांगितली. सेवेत येऊन चारच महिने झाल्याचं वाके यांनी स्पष्ट केलं. यावेळी ठाकरे म्हणाले की, आपली बॅग तपासा काही हरकत नाही. परंतु मिंध्यांची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीस यांची तपासली का? अजित पवारांची बॅग तपासली का? मोदींची तपासली का? अमित शहांची तपासली का? असा प्रश्न त्यांनी केला.
बॅगची तपासणी सुरू असताना ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना या सर्वांच्या बॅग तपासणीचे व्हिडीओ आपल्याला पाठवा अशी सूचनाही निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. आपण सर्वांचे व्हिडीओ तयार करीत आहे. मोदी, शाह, फडणवीस, पवार, शिंदे यांच्यापुढं शेपूट घालू नका असा इशाराही ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला. हेलिकॉप्टरमध्ये आपला युरीन पॉट आहे. त्यांचीही तपासणी करा. काय उघडायचे ते उघडा. नंतर मीच सगळ्यांना उघडतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे यांचा दौरा नागपूर येथेही आहे. त्यावेळी नागपुरातही बॅग तपासणार का, असा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावर आपली ड्यूटी केवळ वणी येथे असल्याचं निवडणूक पथकातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात एमपीचे लोक
उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर तपासणीचे व्हिडीओ चित्रीकरण निवडणूक विभागाच्या पथकानं केलं. त्याचं चित्रीकरण करणाऱ्याचं नावही ठाकरेंनी विचारलं. त्यावेळी नाव सांगत व्हिडीओग्राफरनं आपण मध्य प्रदेशातील असल्याचं नमूद केलं. त्यावर ठाकरे यांनी महाराष्ट्रात एमपीची माणसं नियुक्त केली, असा टोलाही लगावला. या तपासणीनंतर उद्धव ठाकरे यांनी वणीच्या सभेत या मुद्द्यावरून जबरदस्त हल्लाबोल केला. माझ्या बॅगा तपासल्याबद्दल मी अधिकाऱ्यांवर रागावलो नाही. जशी माझी बॅग तपासली, तशी मोदी – शहांचीही बॅग तपासण्याचे धाडस दाखवावे. ढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेटवाल्यासह टरबुजाचीही (फडणवीस) बॅग तपासण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे सभेत म्हणाले.