या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित’ सहमत असेलच असं नाही.
Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी चांगलीच गाजत आहे. प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोपांच्या तोफा डागल्या जात आहेत. प्रत्येक नेता आपल्या मनातील खदखद मनमुरादपणे व्यक्त करीत आहे. यासर्व घडामोडीत काही लोकप्रिय नेते प्रकाशझोतात राहण्यासाठी काय युक्ती शोधतील यांचा भरवसा राहिलेला नाही. साध्या, सरळ गोष्टींना वेगळे वळण देण्याचा प्रकारही सुरू आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीचा व्हिडीओ ड्रामा सध्या चांगलाच गाजत आहे.
गेल्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या तपास यंत्रणांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगची दोन वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली. आपल्या सारख्या मुख्यमंत्री राहिलेल्या आणि मुख्यमंत्रिपदाचा आगामी चेहरा असणाऱ्याची बॅग तपासली जाते, हे उद्धव ठाकरे यांना रुचले नाही. आता बिचारे कर्मचारी नेमून दिलेले काम वरिष्ठांच्या आदेशानुसार चोख बजावतात. त्यांना कोण कुठला जहागिरदार आहे, याच्याशी काही घेणेदेणे नसते.
प्रश्नांचा भडीमार
बॅग तपासणीने उद्धव ठाकरेंना अपमानास्पद वाटले. त्यांनी उगाच वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. त्यांना भंडावून सोडले. कर्मचारीही बिचारे गांगरून अन् घाबरून गेले. अशाही स्थितीत संयम राखत त्यांनी आपले कर्तव्य बजावले. उद्धवजींनी पत्रकाराच्या थाटात त्यांना प्रश्न विचारले. व्हिडीओ शूटिंगही केले. काय नाव तुमचे. कुठले राहणारे. कुणाकुणाच्या बॅग तपासल्या आतापर्यंत. मीच पहिला गिऱ्हाइक सापडलो का? मिंध्यांची तपासली का. फडणवीसांची तपासली का. अजित पवार यांची तपासली का. मोदी-अमित शाह यांची तपासली का. माझी बॅग तपासताय बरोबर आहे. पण त्यांच्याही तपासा. तिकडे शेपूट नाही घालायचं तुम्ही. मला व्हिडीओ पाठवा. बॅगा तपासतानाचा. मी हा व्हिडीओ रिलीज करतोय, असं ते म्हणाले.
व्वा उद्धव साहेब व्वा. मानलं बुवा तुम्हाला. तुमच्या सारखे सतर्क नेते आहेत म्हणून महाराष्ट्र टिकून आहे. काय तुमचं बोलणं. काय तुमचा आविर्भाव. काय तुमचा अभिनय. आम्ही तर थक्क होऊन गेलो बुवा. बॅग तपासणाऱ्या पामरांना तुम्ही कोण आहात हे ठाऊक नव्हतं काय? तपास करावा लागेल. वणी येथे रंगलेला हा व्हिडीओ ड्रामा चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे चक्क कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असल्याचे जाणवते. वक्तव्ये आक्षेपार्हच म्हणावी लागतील. त्यांची भाषा आणि बोलण्यातील आविर्भाव अजिबात लोकतांत्रिक नाही.
अधिकारी गुलाम
यंत्रणा कोणत्याही पक्षाची गुलाम नसते. तिचे स्वतंत्र अस्तित्व आणि अधिकार असतात. नेमून दिलेले काम ते प्रामाणिकपणे करीत असतात. बॅग तपासणी करण्याला वेळ लागतो तरी किती? आपल्या मागे कुणीतरी लागले आहे, अशा भ्रमात राहण्याचा हा प्रकार आहे. आपण अतीविशिष्ट व्यक्ती आहोत, असे भासवून स्वतःसाठी आणि पक्षासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी केलेली धडपड त्यातून दिसून येते. एका
कर्मचाऱ्याला उद्धव ठाकरे विचारतात. चार महिन्यांत किती बॅग तपासल्या. तो कर्मचारी म्हणाला आपली पहिलीच बॅग तपासतोय साहेब. येथे हेलीकॅप्टरने आलेले आपणच पहिले आहात साहेब. कर्मचारी नम्रपणे सांगत असतो. यावर उद्धवजी आश्चर्य व्यक्त करतात.कुठे काय बोलावं याचं तारतम्य ही त्यांना राहिलेलं दिसत नाही.
तपास यंत्रणा नेमून दिलेलं काम करतात. कुणाविषयी भेदभाव करण्याचं काही कारण नसतेच. आजवर आमच्याही बॅगा तपासण्यात आल्या आहेत. बहुतेक नेते असं आवर्जुन सांगतात. मग उद्धवजींना वाईट वाटायचे कारणच काय, असा प्रश्न सहज उपस्थित होतो. निवडणूक आयोग त्यांना बहाल केलेल्या अधिकारानुसार व कर्तव्याचा भाग म्हणून आपली जबाबदारी पार पाडतात. आपल्या देशात लोकतांत्रिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया होते, हे सर्वच जाणतात. बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे वेगळे वळण देण्याचा का प्रयत्न करीत आहेत हे समजायला मार्ग नाही.
निव्वळ अवडंबर
बॅग तपासणीच्या साध्या प्रकाराचे दोन दिवसांपासून निव्वळ अवडंबर माजविण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशी अशी खरमरीत टीका केली आहे. जुहू एअरपोर्टला माझीही बॅग तपासली होती. त्यात वेगळं काय आहे? कुठे काय बोलावं, कसं बोलावं हेही कळत नाही. कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र मागितलं. कुणी आपले नियुक्तीपत्र सोबत घेऊन फिरतो का, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडविली. फक्त मला मुख्यमंत्री करा. माझ्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घाला. बाकी गेलं तेल लावत, असे शाब्दिक बाण राज ठाकरे यांनी सोडले.
Vani Constituency : हेलिकॉप्टरमधून उतरताच तपासली उद्धव ठाकरेंची बॅग
ज्याच्या हातून दोन पैसे सुटत नाहीत त्याच्या बॅगमध्ये काय सापडणार. रुमाल आणि कोमट पाण्याची बाटली. या निवडणूक आयोगाची कमाल वाटते. कुणाच्याही बॅगा तपासतात, असेही ते मिश्कीलपणे म्हणाले. पूर्वी लहानपणी मुलं मामाचं पत्र हरवलं, ते कुणाला सापडलं हा खेळ मन लावून खेळायचे. बालबुद्धीचे नेते आता सवंग प्रसिद्धीसाठी माझी बॅग तपासली सारखा गंमतीशीर खेळ खेळत आहेत. ही नेतेमंडळी राजकारणात नवनवीन हास्यप्रयोग रंगवित आहेत. सध्या माझी बॅग तपासलीचे प्रयोग तुफान गाजत आहेत.