Amravati constituency : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना निवडणूक आयोगाने आखून दिल्यानुसार खर्च सादर करावयाचा होता. मात्र उमेदवारांनी दिलेला खर्च जुळून येत नसल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे व प्रहारचे दिनेश बुब यांना निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे. हिशेब देता-देता उमेदवारांच्या नाकी नऊ आले आहेत.
निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 च्या निवडणूकांची घोषणा करतांना उमेदवार निवडणूक प्रचारासाठी किती पैसे खर्च करु शकतो ही मर्यादा घातली होती. हा खर्च 10 किंवा 20 लाख रुपये नाही तर हा खर्च 389 पट जादा म्हणजेच 95 लाख रुपयांपर्यंत करता येणार होता. यात चहापासून बैठका, रॅली, सभा आणि जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्च. खर्च मर्यादा 25 लाखाने वाढवून ती 95 लाख केली होती. त्यानुसार दैनंदिन खर्चाचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिका-यांकडे सादर करण्याच्या सूचना सर्व उमेदवारांना दिल्या होत्या. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा आहे.
खर्च जुळत नाही
उमेदवारांना निवडणूक आयोगाने आखून दिल्यानुसार खर्च सादर करायचा होता. मात्र, उमेदवारांनी दिलेला खर्च जुळून येत नसल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांना नोटीस बजावली आहे. उमेदवारांच्या खर्चाच्या शॅडो रजिस्टरनुसार खर्च जुळत नसल्याने अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नोटीस बजावल्या आल्या असून तात्काळ उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
राणा यांचा 1 कोटी 26 लाखावर खर्च
अमरावती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक खर्च महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केल्याचे दिसत आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे व प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी 28 लाखपर्यंत खर्च दाखवला आहे. नवनीत राणा यांनी 1 कोटी 26 लाख 69 हजार 176 रुपये खर्च केला. तर राणा यांनी 17 लाख 30 हजार 576 खर्च दाखवला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी 58 लाख 22 हजार 252 रुपये खर्च केला असून त्यांनी 24 लाख 1 हजार 747 रुपये खर्च दाखवला आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बाब यांचा 77 लाख 13 हजार 784 रुपये खर्च केला असून त्यांनी 28 लाख 47 हजार 554 रुपये खर्च दाखविला आहे.आता त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.