Shiv Sena UBT : बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन देशमुख यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी (30 ऑक्टोबर) राज्यभरातील विधानसभानिहाय उमेदवारी अर्जांची छाननी केली. छाननीत अनेकांचे अर्ज बाद झालेत. अशात बाळापूरमधून नितीन देशमुख यांचा अर्जही बाद करण्यात आला आहे. परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नितीन टाले यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला आहे.
देशमुख यांचे गंभीर आरोप
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार नितीन देशमुख हे स्वत:ची सुटका करून घेत परत आले होते. परतल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आपल्याला इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं ते आजही सांगतात. आमदार देशमुख यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीही सुरू करण्यात आली. देशमुख यांच्या मुलांच्या शाळेतून एसीबीने फी बाबतचा तपशिल मागवला होता. त्यामुळे देशमुख यांचा पाराही चढला होता. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले ढाण्या वाघ म्हणून आमदार नितीन देशमुख यांच्याकडे पाहिले जाते.
पुन्हा संधी
उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिल्याचे बक्षीस त्यांना मिळाले. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना बाळापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा संधी दिली. आमदार देशमुख यांना संधी मिळणारच याची सर्वांनाच खात्री होती. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यादृष्टीने तयारीही सुरू केली होती. महाविकास आघाडीत शिवसेना घटक पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेच्या काही नेत्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री होती. आमदार नितीन देशमुख, गोपाल दातकर, अकोल्याचे शहर प्रमुख राजेश मिश्रा ही त्यातील काही नावे. अशात आमदार नितीन देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बुधवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वच उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली. यात एकूण 26 अर्ज वैध ठरले. तीन अर्ज फेटाळण्यात आले. त्यात अपक्ष उमेदवार प्रमोद पोहरे, संजय काटकर आणि नितीन देशमुख यांच्या नावाचा समावेश होता. स्वीकारण्यात आलेल्या अर्जांमध्ये मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नितीन टाले यांचे नाव होते. फेटाळण्यात आलेल्या अर्जांची यादी बाहेर येताच. अनेकांना धक्का बसला. नितीन देशमुख यांचा अर्ज फेटाळल्याच्या वार्तेने प्रचंड खळबळ उडाली. अनेकांचं टेन्शन वाढलं. आता कसं होणार? असं अनेकांना वाटू लागलं. मात्र लगेच सगळ्यांचा संभ्रम दूर झाला. आमदार नितीन देशमुख यांचं रेकॉर्डवरील नाव पाहिल्यानंतर
Akola West : हरीशभाईंसाठी कार, ट्रेन, विमान की खास दिवाळी ऑफर?
असे झाले ..
उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणारे आमदार नितीन देशमुख यांचं रेकॉर्डवरील नाव नितीन भीकनराव टाले असं आहे. देशमुख ही त्यांची समाजातील नावाची पदवी आहे. त्यामुळं त्यांना नितीन बाप्पू देशमुख असंही हाका मारल्या जातं. ज्या नितीन देशमुख यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला, त्याचं नाव नितीन विश्वासराव देशमुख असं आहे. अर्ज फेटाळलेले नितीन देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ठाकरेंचे नितीन बाप्पू निवडणुकीच्या रेसमध्ये कायम आहेत. विरोधकांना त्यांनी ‘झुकेना नही साला..’ असं पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे.