संपादकीय

Assembly Elections : दिवाळीनंतर निवडणूकीचा बार

Maharashtra Politics : प्रतीक्षा संपली; राजकीय पक्ष लागले कामाला!

अखेर प्रतिक्षा संपली आहे. बिगुल वाजला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार हे निश्चित झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत घोषणा केली. काही दिवसांपूर्वी निवडणुकीसंदर्भात वेगवेगळ्या बातम्या उमटत होत्या. निवडणूक होणार की पुढे ढकलली जाणार याबाबत संभ्रम कायम होता. महायुती विजयाच्या बाबतीत आश्वस्त होत नाही, तोपर्यंत निवडणूक घोषित होणार नाहीत, अशी टीका विरोधक करत होते. आता या बाबींना विराम मिळाला आहे.

वेगळाच माहोल

महाराष्ट्रातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा माहोल वेगळाच आहे. या निवडणुकीला जवळपास युध्दाचे स्वरूप आले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात खरा सामना होणार आहे. इतर आघाड्या मैदानात उतरत आहेत. तेही आता बिनधास्त विजयाचा दावा करत आहेत. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. पुन्हा आपलेच सरकार सत्तारूढ व्हावे यासाठी त्यांनी जोरकस प्रयत्न चालविले आहेत. धडाकेबाज योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

विरोधकांची टीका अन् सत्ताधाऱ्यांची साखर पेरणी

महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडी जेरीस पेटली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष भाजपने फोडले असा आरोप मविआकडून वारंवार होतो. जनतेची सहानुभूती मिळवण्याचा तो नामी डाव आहे. जनतेच्या मनात महायुती विषयी संशय व संभ्रम निर्माण करण्यात विरोधकांना काहीसे यशही मिळाले. आता सहानुभूतीची लाट ओसरत चालल्याचे चित्र दिसते. थेट लाभ देणाऱ्या योजनांची साखर पेरणी महायुतीसाठी फायद्याची ठरत आहे. लाडकी बहिण, शेतकरी दादा खुष आहेत. निवडणूक घेण्यासारखे पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून बिगुल वाजविण्यात आला आहे.

केंद्रीय पथकाचा दौरा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला. अकरा राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. सुचनांवर विचार करण्याचे आश्वासन दिले. निवडणूक पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

असाच उमेदवार का निवडला

निवडणुकीच्या रिंगणात सारेच सज्जन उमेदवार उतरतात असे दिवस राहिले नाहीत. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना प्रमुख पक्ष तिकीट देतात. आता तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार बिनधास्त निवडणूक रिंगणात उतरवले जातात. विशेष म्हणजे नावाजलेले पक्ष त्यांना उमेदवारी देताना दिसतात. आता मात्र अशा उमेदवारांबाबतचे स्पष्टीकरण राजकीय पक्षांना द्यावे लागणार आहे. ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत त्या उमेदवाराने वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक राहणार आहे.

Assembly Elections : बाळापूर मतदारसंघावरून महायुतीत ओढाताण!

मतदानाची कमी टक्केवारी

अनेक मतदारसंघांतील मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. मतदान जागृतीसाठी दृकश्राव्य माध्यमे तसेच लोक कलाकार यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

निवडणूक खर्चाची मर्यादा

निवडणूक खर्चाची मर्यादा चाळीस लाख रुपये आहे. तीच कायम राहणार आहे. खर्चाची मर्यादा वाढवावी अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली आहे. खर्च मर्यादा देशातील निवडणुकांसाठी समान असते. ती एका राज्यासाठी होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन मतदार वाढले

राज्यात ९ कोटी ५३ लाख मतदार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६० लाख आहे. महिला मतदारांच्या संख्येत १०.९७ लाखांची भर पडली आहे. १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या १९ .४८ लाख इतकी लक्षणीय आहे. हे मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. १०० वर्षा वरील मतदारांची संख्या ४९ हजार एवढी आहे. त्यांचे साठी घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यात १ लाख ८६ हजार मतदान केंद्रे राहणार आहेत.

अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलीस महासंचालकांसह काही अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत काही पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतील असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. पोलीस तसेच महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या का करण्यात आल्या नाहीत अशी विचारणा केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला केली आहे.

लोकशाहीचा उत्सव

निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो. या महत्त्वाच्या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे ही अपेक्षा असते. काही जण निरुत्साही असतात, मतदान करत नाहीत. चांगले लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी मतदान करणे आवश्यक असते. त्यांचा मतदारांनी विसर पडू देऊ नये. मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तेवढेच आवश्यक ठरते. राज्यात निवडणूक कोणत्या तारखेला होईल हे निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेले नाही. लवकरच त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणूकांची तारीख ६ ते १० ऑक्टोंबर रोजी जाहीर होईल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!