High Alert : दिवाळीनंतर पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या मंडईवर यंदा निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष राहणार आहे. यावर्षी मंडई आणि विधानसभा निवडणूक एकत्र आल्याने पोलीस आणि महसूल प्रशासन सतर्क झाले आहे. गेल्या वर्षी भंडारा जिल्ह्यातील मंडईमध्ये आपत्तीजनक कार्यक्रमांचे आयोजन झाले होते. भंडारा जिल्ह्यात एका ठिकाणी एका मोठ्या राजकीय नेत्याने नृत्य करणाऱ्या मुलीवर नोटांची उधळण केली होती. इतकेच नव्हे तर एका ठिकाणी न्यूड डान्सचा प्रकारही घडला होता.
या दोन्ही घटनांनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. ज्या मंडईमध्ये न्यूड डान्सचा प्रकार घडला तेथे तैनात असलेल्या पोलिसांना कारवाईला सामोरे जावे लागले होते. यावर्षी मंडईनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांची संपर्क साधण्यासाठी मंडई हे नेत्यांसाठी सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित होणाऱ्या मंडईवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे.
दारू, नोटांची उधळण
पूर्व विदर्भातील मंडईच्या माध्यमातून अनेक नेते आपलं शक्तीप्रदर्शन करतात. मात्र यंदा निवडणूक आचारसंहिता असल्याने पूर्व विदर्भातील सर्वच मंडई आयोजनावर लक्ष ठेवण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मंडईच्या ठिकाणी दारू आणि नोटांची उधळण होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. वेगवेगळ्या गावातून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण मतदार मंडईच्या ठिकाणी येतात. यामध्ये तरुणाईची संख्या मोठी असते. त्यामुळे तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रलोभनांचा वापर करू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भंडारा जिल्ह्यात मंडईदरम्यान करण्यात आलेल्या अश्लील नृत्यानंतर यंदा पोलीस विभागाला परवानगी देताना डोळ्यात तेल घालून तपासणी करावी लागणार आहे. मंडई आणि विधानसभा निवडणूक एकाच महिन्यात आल्याने यंदा परराज्यातील लोकही पूर्व विदर्भात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमावर्ती भागामध्ये नकाबंदी आणि पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. पूर्व विदर्भाला लागून असलेल्या राज्यांमधून पैसा आणि दारू यांचा पुरवठा होणार नाही, यावर सध्या पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे. अन्य राज्यातून निवडणुकीच्या कामासाठी भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात नेमणुकीवर आलेले निवडणूक निरीक्षक आणि पोलीस बंदोबस्त निरीक्षकही या भागांचा दौरा करणार आहेत. त्यामुळे यंदाची मंडई कोणाला फायदेशीर ठरणार आणि कोणाच्या मागे दंडार लावणार हे पाहण्यासारखे ठरेल.