Political Campaign : लोकसभा निवडणुकीचे रण आता तापू लागले आहे. निवडणूक प्रचारासाठी अवघा सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रचाराची फायनल सुरू झाली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या विजयासाठी महायुतीतील घटक पक्ष दक्ष झाले आहेत. सर्वच प्रचारात सक्रिय दिसत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ घटक पक्षाचे नेते अद्यापही आक्रमकपणे प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र नाही. सुनील मेंढे यांची महायुतीवर तर पडोळे यांची संपूर्ण भिस्त ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराची तुलना आत मतदारच करू लागले आहेत. महायुतीने सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन व समन्वय साधून प्रचारात पूर्णपणे झोकून दिल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मोठ्या नेत्यांच्या सभासुद्धा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल हे तीन दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकून सभा, बैठक, मेळावे घेत आहेत. त्यांनी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुद्धा चार्ज केले आहे. महायुतीत सहभागी घटक पक्षाचे नेते प्रचारात एकत्रित दिसत आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे हे भंडारा सोबतच गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन प्रचार करताना दिसत आहेत. त्यांनी मोठ्या सभा न घेता अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी दिसत आहेत. पण घटक पक्षाचा पाहिजे तसा सहभाग अद्यापही दिसून आला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि खासदार मुकुल वासनिक यांची संयुक्त सभा वगळता जिल्ह्यात मोठ्या नेत्यांची सभा अजूनही झाली नाही.
महाविकास आघाडीत सहभागी घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांना विचारले तर आम्ही पूर्णक्षमतेने पडोळे यांच्या प्रचारार्थ सक्रिय असल्याचे सांगतात. पण त्यांचा हा सहभाग मात्र प्रत्यक्षात दिसून येत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर संपूर्ण राज्याची जवाबदारी असल्याने त्यांना इतर ठिकाणीही प्रचारसभांसाठी जावे लागते. त्यामुळे ते सुद्धा अधूनमधून जिल्ह्यात प्रचारात दिसत असल्याचे पहायला मिळत आहेत.