Shiv Sena News : लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी आपली उमेदवारी दाखल केली. राजश्री पाटलांसाठी शिंदेंनी विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापली आहे. त्यामुळे त्या गुरुवारी राजश्री पाटील यांची उमेदवारी दाखल करतानाही गैरहजर राहिल्या. उमेदवारी न मिळाल्याने भावना गवळी प्रचंड नाराज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गवळी यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला आहे.
राजकारणात आपल्याला काही कटू निर्णय घ्यावे लागतात. पण कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. पण आम्ही महायुतीचा अनादर करणार नाही, असे एकनाथ शिंदे खासदार भावना गवळींना उद्देशून म्हणाले. जश्री पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत एकनाथ शिंदे यांनी भावना गवळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भावना गवळी गुरुवारी राजश्री पाटील यांची उमेदवारी भरताना गैरहजर राहिल्या. आपल्या अनुपस्थितीतून त्यांनी नाराजी दाखवून दिली आहे.
राजश्री पाटलांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संजय राठोड, मदन येरावार, दादा भुसे आदी आमदार उपस्थित होते. त्यामुळे गवळी हजर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण त्यांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. यामुळे त्या शिंदेंवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले. भावना गवळी यवतमाळ-वाशिमची उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मुंबईत ठाण मांडून बसल्या होत्या.
नागपुरात जात भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. पण त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले होते. राजश्री पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचीही वल्गना केली होती. पण अखेर त्यांनी आपली तलवार म्यान करत शांत राहणे पसंत केले. पण त्यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार हे खरे आहे. परिणामी शिंदेंनी त्यांना वाऱ्यावर न सोडण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला आहे.
तिकीट का कापले?
यवतमाळ-वाशिममध्ये सलग पाच टर्म निवडून आलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना बुधवारी एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. यासाठी भाजपकडून करण्यात आलेल्या आठ सर्वेक्षणांचा ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट प्रमुख कारण ठरले आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या आठही सर्वेक्षणांचे निकाल भावना गवळींच्या दृष्टीने नकारात्मक होते. त्यांच्याविरोधात ‘अन्टी-इन्कम्बन्सी’चे वातावरण असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणांमधून पुढे आला होता.
Lok Sabha Election : यवतमाळात भावना गवळी यांची गच्छंती, राजश्री पाटील यांना उमेदवारी
भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची मतदारसंघातील निष्क्रियता. एकदा निवडून आल्यानंतर भावना गवळी पुढील चार वर्षे मतदारसंघात फिरकत नाहीत, असा आरोप अनेकांनी केला. पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत भावना गवळी यांचा वाद आहे. संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत. त्यामुळे भावना गवळी यांना मिळणारी बंजारा मते कमी झाली होती, अशी माहितीही सर्वेक्षणातून पुढे आली होती.