Announcement Before Assembly Election : महाराष्ट्रातील सत्ता हाती घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत तुंबळ युद्ध सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एकमेकांची उणीदुणी काढली जात आहे. टाचणी जरी पडली तरी विरोधक आंदोलन करीत आहेत. अशात महायुतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता आहे. या योजनेचा फायदा घेत महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा मतपेरणी केली. शनिवारी (ता. 31) नागपुरातील रेशीमबाग परिसरात आयोजित कार्यक्रमाचा मुहूर्त त्यासाठी साधण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना ट्रेलर असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा आले तर ‘आम्ही तीन भाऊ, ओवाळणी नक्कीच वाढवू’ असा शब्दच त्यांनी देऊन टाकला. राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होईल, असे शिंदे यांनी सांगितले. दीड नव्हे अगदी तीन कोटी पर्यंत महिलांची लाभार्थी संख्या गेली तरी तिजोरीत भरपूर पैसा असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
सर्वाधिक अर्थसहाय्य
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने ‘मुख्यमंत्री लाडली बहना योजना’ लागू केली. या योजनेमुळेच शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना यश मिळाले. याच योजनेच्या जोरावर लोकसभा निवडणुकीतही भाजपचे मध्य प्रदेशात भरपूर मतदान मिळविले. मध्य प्रदेशच्या धर्तीवर अगदी सेम टू सेम योजना महायुती सरकारने महाराष्ट्रात लागू केली. मात्र अर्थसहाय्यक देताना महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेशला ‘ओव्हरटेक’ केले. सगळ्यात जास्त म्हणजे दीड हजार रुपये दरमहा महिलांना देण्यास सुरुवात झाली आहे. अद्यापही या योजनेचे अर्ज स्वीकारण्याचा क्रम सुरू आहे. अशातच शनिवारी (ता. 31) नागपुरातून दुसऱ्या टप्प्यातील रक्कम वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ही टीका करताना त्यांनी लाडकी बहीण योजना केवळ ‘ट्रेलर’ असल्याचे म्हटले. त्यामुळे महिलांसाठी आणखी कोणकोणत्या योजना महायुतीच्या यादीत आहेत, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. निवडणुकीच्या बऱ्याच आधीपासून महायुती सरकारने महिलाकेंद्रीत अनेक योजना सुरू केल्या. लाडकी लेक, एसटीतून प्रवास सवलत, महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक, शिष्यवृत्ती, विद्यार्थिनींना वसतिगृह, मोफत शिक्षक अशा योजना राबविण्यास सरकारने सुरुवात केली. ऐन निवडणुकीपूर्वी महायुतीचे ‘सुपर स्ट्रोक’ मारत लाडकी बहीण योजना जाहीर केली.
योजना जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी रान पेटविले. परंतु आता हाच विरोध महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरत आहे. 14 ऑगस्टपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाल्याने महिला सध्या आनंदात आहेत. वर्षातून दोन मोफत गॅस सिलिंडरही त्यांना मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला वर्षाचा 18 हजार रुपये मिळणार आहे. गॅस सिलिंडरचा विचार केल्यास सुमारे दीड ते दोन हजार रुपयांची बचत होणार आहे. अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार असल्याचे जाहीर केले आहे. महायुतीमधील अनेक नेतेही लाडक्या बहिणींना दोन हजार ते तीन हजार मिळतील असा दावा करीत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींचा आशीर्वाद महायुतीला मिळण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वाढली आहे.