महाराष्ट्र

Assembly Election : उमेदवारी नाकारली म्हणून आत्महत्येचा विचार

Srinivasa Vanaga : शिंदेंचे आमदार ढसाढसा रडले

Shiv Sena  : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज मंगळवार (29 ऑक्टोबर) हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास आता वेग आला आहे. प्रमुख पक्षांचं जागा वाटपाचं कामही आता अंतिम टप्प्यात आलं आहे. नेहमीप्रमाणे या निवडणुकीत देखील काही विद्यमान आमदारांचं तिकीट त्यांच्या पक्षानं कापलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या एका आमदाराला तिकीट नाकारले आहे. यामुळे हे आमदार मागील दोन दिवसांपासून कोणाशी बोलले नाही. आत्महत्या करण्याचा विचारही त्यांच्या डोक्यात आला, असे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले आहे.

का नाही उमेदवारी..

एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं पालघर विधानसभा निवडणुकीत राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्यानं विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर झाले. ‘मतदारसंघात मी चांगलं काम केलं. मी प्रत्येक वेळी गावित यांच्यासाठी तडजोड केली आहे. मला यंदा चांगली संधी आहे. त्यानंतरही मला उमेदवारी नाकारली. माझ्या वडिलांपासून मी एकनिष्ठपणे काम केल्याचं हेच फळ आहे का?’ असा सवाल श्रीनिवास वनगा यांनी विचारला आहे. व्यक्त होताना ते ढसाढसा रडत होते.

उमेदवारी नाकारल्यानं श्रीनिवास वनगा यांना नैराश्य आलंय. नैराश्यातून आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, असा दावा त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी केला आहे. उद्धव ठाकरे देव माणूस आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी विश्वासघात केला, असा आरोप त्यांनी केला. ‘माझे पती श्रीनिवास वनगा पालघर विधानसभेत व्यवस्थित काम करत होते. त्यांनी कधी कामाची प्रसिद्धी केली नव्हती. उमेदवारी मिळण्यासाठी त्यांना आशा होती. मुलाचा वाढदिवस असूनही ते शिंदेंसोबत सुरतला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यांची मनस्थिती चांगली नाही. ते दोन दिवसांपासून जेवत नाही. शिंदे साहेबांनी 39 आमदारांचं पुनर्वसन केलं. माझ्या पतीचं काय चुकलं? असा सवाल त्यांनी केला. त्यांना नैराश्य आलंय. त्यांचं काही बरं वाईट झालं तर मी कुणाला जबाबदार धरु? असा उद्विग्न सवालही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंकडे जाऊन माफी मागणार

वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण सांगून बंड करणारे एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुजरातला गेले होते. मात्र त्यांचेच तिकीट कापण्यात आले. आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप श्रीनिवास वनगा यांनी केला आहे. ‘मला आमदार करणारे उद्धव ठाकरे होते. त्यांच्या कृपेमुळेच मी आमदार झालो आणि त्या देव माणसाची मला माफी मागायची आहे. मी त्यांच्याकडून कुठल्याही पदाची अपेक्षा करत नाही. पण मी माझ्या केलेली चुकीची माफी मागणार आहे, असं ते म्हणाले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!