महाराष्ट्र

Maharashtra Assembly : हा शिंदे कधी खोटं बोलला नाही, बोलणार नाही!

Eknath Shinde : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्र्यांचा टोला

Monsoon Session : महाराष्ट्र सदनाच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर अनेक आमदारांनी सरकारकडे विविध प्रकारची मागणी केली. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन करण्यास सांगितले. एकनाथ शिंदे उत्तर देत असताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार सभागृहात उभे राहिले. त्यांनी एक वाकप्रचार सभागृहात सांगितला. त्यानंतर विरोधी बाकांवरील आमदारांनी शिंदे यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्याचे काय असा प्रश्न केला. शिंदे उत्तर देत असताना अनेकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

यावेळी शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची हिंमत फक्त महायुतीच्या सरकारने दाखविली आहे. तुफान फटकेबाजी करीत शिंदे यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. ‘एकनाथ शिंदे याने जो शब्द दिला तो खरा केला.’ असे मुख्यमंत्री म्हणाले. 

विरोधकांनी यावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदे यांनी हा हल्लाही परतावून लावला. ‘हा एकनाथ शिंदे कधीही खोटं बोलला नाही. बोलत नाही आणि बोलणारही नाही. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवितो’, असे चोख प्रत्युत्तर त्यांनी सर्वांना दिले. शेतकऱ्यांसाठी केलेल्या सर्व योजना एक जुलैपासून सुरू होतील असे ते म्हणाले. अर्थमंत्री अजित पवार यांची पाठ थोपटताना ते म्हणाले की, ‘दादा का वादा पक्का रहता है..’ त्यामुळे कोणीही शेतकऱ्याबद्दल काळजी करण्याचे कारण नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखले जाणारे शिंदे यांनी आपल्या या भाषणातून सभागृह गाजवले.

हा घ्या पुरावा

शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा जीआरच मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात सादर केला. हा जीआर सादरच केला नाही, तर त्यांनी शिपायाच्या मदतीने तो विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठवलाही. जयंत पाटील यांचा समाचार घेताना शिंदे म्हणाले की, जयंतराव म्हणाले लोकसभेत चादर फाटली. चादर फाटलेलीच नाही.

Maharashtra Legislative Assembly : गडचिरोलीच्या आरोग्य सेवेवरून वडेट्टीवार पुन्हा आक्रमक !

एनडीएचेच सरकार आले आहे. नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले आहेत. अशात काँग्रेस नेते पेढे वाटत सुटले आहेत. दहा वर्षांनंतर विरोधी पक्षनेतेपद लोकसभेत मिळाले याचा हा आनंद आहे का? असा सवाल शिंदे यांनी केला. विजय वडेट्टीवार यांना उद्देशत शिंदे म्हणाले की, ‘विजयराव तुम्ही माझे चांगले मित्र आहात. जे पेढे वाटत सुटले आहेत, त्यांना जरा समजावून सांगा तरी.’

जागा दाखविली

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडल्याच्या मुद्द्यावर शिंदे यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदे लपून काहीच करत नाही. जे करतो ते उघडपणे करतो. दोन वर्षांपूर्वी जे केले ते उघडपणे केले. लपून केले नाही. त्यातून सर्वांना त्यांची जागा दाखवून दिली, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. अशातच जयंत पाटील यांचा सभागृहात प्रवेश झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जयंतराव आलेत, असा उल्लेख केला. चादरवाले आले, असा टोलाही शिंदे लगावला. विजय वडेट्टीवार यांच्यासंदर्भात सभागृहात काही सदस्यांनी नसल्याचा उल्लेख केला. त्यावर वडेट्टीवार यांनी प्रकृती बरी नसल्याचे आधीच कळविले होते असे म्हणत आक्षेप घेतला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवार यांना लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राला तुमच्यासारख्या सक्षम विरोधी पक्षनेत्याची गरज असल्याचेही शिंदे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!