Maharashtra Politics : भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 जणांना राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शपथविधी सोहळ्यानंतर महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. याची सर्वाधिक तीव्रता आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघायला मिळत आहे. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे तानाजी सावंत नाराज झाले आहेत.
मंत्रिपद न मिळाल्यानं तानाजी सावंत अधिवशेनातून निघून गेले आहेत. प्रकृती खराब असल्याचं कारण देत ते पुण्याला रवाना झालेत. पुण्यात पोहोचल्यानंतर त्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावरूनही व्यक्त केली. सावंत यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सावंत यांच्या नाराजीचा पुढचा अंक आता सुरू झाला आहे. त्यांनी फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरील धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं आहे. त्यामुळं आपली खिंड लढविण्यासाठी शिंदेंच्या तानाजींनी आता तलवाल उपसल्याचं दिसत आहे. कोणत्याही परिस्थिती गड आणि सिंह दोन्हीही राहिले पाहिजे, असा त्यांचा रोख असल्याचं यावरून दिसत आहे.
सर्वत्र चर्चा
तानाजी सावंत यांनी धनुष्यबाण हटवून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो स्टेटसवर ठेवला आहे. या फोटोवर शिवसैनिक असं लिहिलं आहे. याशिवाय त्यांच्या फेसबुकवरही केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसत आहे. त्यामुळं मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी असलेले तानाजी सावंत आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तानाजी सावंत सहभागी होणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. सावंत यांच्या या नाराजी नाट्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळं शिंदे त्यांची समजूत कशी काढतात याची उत्सुकता सर्वांना आहे.
Uday Samant : नरेंद्र भोंडेकरांसह सर्व नाराजांची समजूत काढणार
तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलण्याचंही टाळलं आहे. त्यांच्या कार्यालयाकडून माध्यमांसाठी पत्रकही जारी करण्यात आलं होतं. अशात त्यांनी सोशल मीडियावरील आपल्या स्टेटसमध्ये बदल केल्यानं ते शिवसेनेतून बाहेर पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक उल्लेख असलेला बाळासाहेबांचा फोटो ठेवला आहे. शपथविधीपूर्वी सावंत नागपूरमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये होते. मंत्रिमंडळ विस्तार आटोपताच त्यांनी बॅग भरत पुण्याचा रस्ता धरला.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर सध्या महायुतीमध्ये अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सावंत यांच्यासह छगन भुजबळ, रवी राणा, कृष्णा खोपडे, संजय कुटे हे देखील नाराज झाने आहेत. या सर्व नेत्यांच्या समर्थकांनी आता शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं महायुतीमधील तीनही नेत्यांपुढं नाराजांना शांत करण्याचं आव्हान आहे.