Chandrapur News : सरकार पाठीशी आहे, असे कामगारांना आश्वस्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बल्लारपूर बामणी प्रोटीन्सच्या संचालकांना कंपनीचे काम सुरू करण्याची सूचना केली आहे. यासंदर्भात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. श्रमिकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील होते. यासंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीनंतर कंपनीचे काम सुरू करण्याची सूचना देण्यात आली.
महाराष्ट्राचे सरकार गतशील आणि कृतिशील आहे. त्यामुळे श्रमिकांनी काळजी करू नये. कंपनी सुरू होईल. बल्लारपूर बामणी प्रोटीन्सच्या संचालकांनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी. त्यानंतर तातडीने कंपनी सुरू करावी, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी दिली. लवकरच कंपनीला अपेक्षित लेखी पत्र देण्यात येईल. बैठक घेऊन ही कार्यवाही पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांनी कामगारांना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे श्रमिकांनी यावेळी सांगितले.
सर्व काही श्रमिकांसाठी
चंद्रपूर जिल्ह्यात श्रमिकांची संख्या मोठी आहे. येथे बामणी प्रोटीन्स प्रकल्प काही कारणांमुळे रखडला होता. कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेऊ. कंपनीच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यात येईल, असा शब्द सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर बामणी प्रोटीन्स येथील भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांना दिला होता. मार्च महिन्यापासून बामणी प्रोटीन्स कंपनी बंद होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले हाते.
श्रमिकांनी सुरू केलेल्या आंदोलनस्थळाला मुनगंटीवार यांनी भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. श्रमिकांच्या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. नऊ) विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
Assembly Election : मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर पुन्हा एकनाथ शिंदेच?
सुधीर मुनगंटीवारही या बैठकीला उपस्थित होते. श्रमिकांचे म्हणणे मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐकून घेतले. सुधीर मुनगंटीवार यांनी विषयाचे गांभीर्य व पार्श्वभूमी मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आणून दिली.
एक हजार कुटुंबांचा प्रश्न
बामणीतील कंपनीमध्ये अनेक श्रमिक कामावर होते. त्यामुळे हा मुद्दा केवळ काही श्रमिकांपुरता नाही तर एक हजार कुटुंबाचा असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केरळ सरकारकडून संचालित या कंपनीच्या ‘डिस्चार्ज वॉटर’चा प्रश्न आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (Maharashtra Pollution Control Board) आलेल्या मार्गदर्शक सूचना, चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भूमिकाही त्यांनी ध्यानात आणून दिली. संपूर्ण विषय समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना यातून सकारात्मक तोडगा काढण्याचे निर्देश दिले. मुनगंटीवार यांची भूमिका श्रमिकांना न्याय मिळावा अशी आहे. त्यामुळे यादृष्टीने मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कंपनीच्या वरिष्ठ संचालकांशी मुख्यमंत्र्यांनी थेट चर्चा केली. त्यांनाही यातून मार्ग काढण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र सरकार यासाठी पूर्णपणे सहकार्य करेल, अशी आश्वासन देखील शिंदे यांनी कंपनीच्या संचालकांना दिले.
कंपनीने मुख्यमंत्र्यांची सूचना व मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचा सन्मान ठेऊ असे सांगितले. महाराष्ट्र सरकारकडून यासंदर्भात आवश्यक पत्र व्यवहार झाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळ बैठकीतमध्ये प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्यानंतर लगेच कंपनी सुरू करता येईल, असे संचालकांनी सांगितले.
विधानभवनातील या बैठकीला भारतीय केमिकल वर्कर युनियन बामणी प्रोटीन्सचे अध्यक्ष देवराव नींदेकर व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बामणी प्रोटीन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव इकबालसिंह चहल, विकास खारागे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, कामगार विभागाच्या सचिव विनीता सिंघल, कामगार आयुक्तआदी उपस्थित होते.