New Scheme Before Election : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1 हजार 500 रुपये जमा होणार आहेत. लाडका भाऊ योजना का नाही ? अशी विचारणा विरोधकांकडून केली जात होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादषीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली. त्यानंतर त्यांनी ‘लाडका भाऊ’ योजनेची घोषणा केली. त्यामुळे आता बहिणींसोबत भावांच्या खात्यातही रक्कम जमा होणार आहेत.
अर्थसंकल्पातील लाडकी बहीण योजनेतून महिलांना वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचे महिलांनी स्वागत केले आहे. योजना जाहीर होताच लाडक्या भावाबद्दल काय? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला जात होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही भावांबद्दलची योजना जाहीर करावी, अशी मागणी केली होती. अशात मुख्यमंत्री शिंदे यांनी तरुणंसाठी असलेल्या खास योजनेची माहिती दिली.
दरमहा धनलाभ
लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार, रुपये मिळणार आहे. डिप्लोमा झालेल्या तरुणांना आठ हजार मिळतील. पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये दरमहा मिळणार आहेत. तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात ‘अप्रेन्टिसशिप’ करेल. त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल. त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखान्यात ‘अप्रेन्टिसशिप’ करतील तिथे त्यांच्यासाठी सरकार पैसे भरणार आहेत. तरुणांना ‘स्टायपेंड’दिले जाईल. इतिहासात प्रथमच एखाद्या राज्य सरकारने अशी योजना आणली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Pravin Darekar : सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांनी स्वत:च्या घराकडे बघावे
योजनेसाठी पात्रता
मूळ महाराष्ट्रातील तरुण या योजनेसाठी पात्र असतील. 18 ते 35 वयेागटातील तरुणांना योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. योजनेच्या लाभासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. तीन गटात तीन वेगवेगळ्या प्रकारचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल. यासाठी बेरोजगार तरुणांना बँकखाते आधारकार्डशी संलग्न करावे लागले. रोजगार विभागावर तरुणांना नोंदणी करावी लागणार आहे.