महाराष्ट्र

Eknath Khadse : भाजपमध्ये प्रवेश झाला मात्र घोषणा अडवली, मी राष्ट्रवादीतच !

BJP Maharashtra : एकनाथ खडसेंनी घेतली 'या' दोघांची नावे

Maharashtra BJP Politics : एकनाथ खडसे यांचा खरोखरच भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आहे का ? आणि झाला असेल तर घोषणा अडली कोठे, या प्रश्नांची अखेर उत्तरे मिळाली आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांची राजकीय अवस्था सध्या तळ्यात-मळ्यात झालेली आहे. अशात आपल्या भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

का झाली नाही घोषणा

यासंदर्भात एकनाथ खडसे म्हणाले, पक्षात प्रवेश होऊनही अद्याप घोषणा झाली नाही. कारण दोन नेत्यांनी वाट अडवली आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे घेतली. माझ्यासाठी भाजप प्रवेशाचा विषय आता संपला असून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. या त्यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे नेमके कुठे या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

खडसे म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश करावा, अशा सूचना मला वरिष्ठांकडून आल्या होत्या. मग मी त्यांना सांगितले की, मला थोडा वेळ द्या. तर त्यांनी विचारले की, वेळ कशाला हवा? आताच प्रवेश करून घ्या. दिल्लीला मी होतो. विनोद तावडे, रक्षा खडसे आणि  नड्डाजींना भेटलो. नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर घालून तुमचा प्रवेश झाला, असे मला सांगितले.

विरोध म्हणून प्रवेश थांबला 

नड्डांनी केलेल्या प्रवेशाला राज्यातील काही नेत्यांकडून विरोध झाला. त्यामुळे मला वाटते की माझा प्रवेश थांबला. लोकसभेची निवडणूक लागली होती. लोकसभेला भाजपचे 9 खासदार निवडून आले. त्यामुळे भाजपची परिस्थिती नाजूक आहे, असे त्या काळात सर्व्हेतही दिसत होते. तशा बातम्याही येत होत्या. भाजपला बळकटी मिळावी, या हेतूने वरिष्ठांकडून मला भाजप प्रवेशाची सूचना केली असावी”, असेही खडसे म्हणाले.

ज्यावेळी रक्षा खडसे निवडणुकीत उभ्या राहिल्या, तेव्हा भाजपला तुम्ही मदत करा म्हटले. मी रक्षा खडसेंना मदत केली. त्या निवडून आल्या. भाजपचा उमेदवार निवडून येईपर्यंत नाथाभाऊ चांगला. निवडून आल्यानंतर प्रवेशाला विरोध केला. आम्ही साथ देणार नाही, असे म्हटले गेले, असे टीकास्त्र खडसे यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांवर डागले.

सगळ्यांना माहिती आहे की, विरोध होण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन या दोघांकडून होऊ शकते. या दोघांचे स्पष्ट नाव घेतो. कारण गिरीश महाजनांनी प्रत्येक वेळी यावर उत्तर दिले आहे. मला अद्यापही हा संभ्रम आहे की, राज्यातील नेते मोठे आहेत की, नड्डाजी. मला त्या खोलात जायचे नाही. भाजप हा विषय मी सोडून दिला आहे, असे खडसे यांनी सांगितले.

मी आता राष्ट्रवादीतच..

माझा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंजूर केलेला नाही. त्यामुळे आता मी भाजपमध्ये जाणार नाही. मी विधानसभा निवडणूक व त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करीत राहीन. खडसे यांनी भाजपच्या स्थापनेपासून पक्षाचे काम केले होते. फडणवीस, महाजन आदी नेत्यांना त्यांनी राजकीय पाठबळ दिले होते. मात्र, या नेत्यांच्या विरोधामुळे खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकला नाही, त्याबद्दल खडसे यांनी दुःख व्यक्त केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!