महाराष्ट्र

Maharashtra Assembly : विदर्भ, मराठवाड्यातील भूकंपाची सरकारने घेतली गंभीर नोंद !

Ajit Pawar : कुठेही जीवितहानी नाही, सतर्कतेचा इशारा

Maharashtra Assembly : बुधवारी 10 जुलै रोजी सकाळी महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यात मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्याचा समावेश आहे. 10 जुलै रोजी पहाटे झालेल्या या धरणीकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

या ठिकाणी भूकंपाचे धक्के

राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. परभणी जिल्ह्यातील परभणी शहर, सेलू, गंगाखेड या भागात तर हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. वाशिम जिल्ह्यातील जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

Maharashtra Assembly : ‘आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा’

वाशिमसह रिसोड तालुक्यातही भूकंपाचा तडाखा जाणवला. नांदेड आणि जालन्यातील अंबड, घनसावंगी, परतूर या तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

अजित पवार यांची माहिती

मराठवाडा आणि विदर्भात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे पडसाद आज विधिमंडळात देखील उमटले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत भूकंपाबाबतची माहिती दिली.

विधानसभेत राज्य शासनाच्या वतीने निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली आहे. संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.

 

राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

किल्लारी भूकंपाच्या आठवणी 

महाराष्ट्रात 30 सप्टेंबर 1993 ला किल्लारीत मोठा भूकंप आला होता. आज मराठवाडा आणि विदर्भात बसलेल्या धक्क्यांमुळे किल्लारीतील भूकंपाच्या आठवणी जाग्या झाल्या. 30 वर्षांपासून 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप किल्लारीत आला होता. या भूकंपामुळे 7 हजारांवर लोकांचा बळी गेला. यात 16 हजार लोक जखमी झाली होती. 52 गावांमधील 30 हजार घरे जमिनीत गाडली गेली. महाराष्ट्रासाठी अत्यंत कटू असणारा हा क्षण आज भूकंपाच्या या धक्क्यांमुळे पुन्हा स्मरणात आला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!