जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 23 जुलै रोजी पार पडली. या सभेत सत्तापक्षात सारेकाही आलबेल नसल्याचे सभागृहात बघायला मिळाले. सत्तापक्षातील कृषी सभापती यांनी व्यासपीठ सोडून सर्वसामान्य सदस्यांच्या मध्ये बसणे पसंत केले. आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
कामांच्या वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप केला. अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी जाब विचारला. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सत्ता पक्षात चालले काय? असाच प्रश्न निर्माण झाला होता. तर दुसरीकडे सभागृहातील विरोधी पक्ष काँग्रेसचे पदाधिकारी मात्र दुबळे पडले होते. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेत, जिल्हापरीषदेच्या सत्ताधाऱ्यांनी विकासाचा मनसुबा दाखविला. मात्र त्यासाठी निधीची कशी तरतूद करणार याचा ताळमेळ मात्र जूळत नसल्याचेही दिसून आले.
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा मार्च महिन्यात पार पडली. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे जिल्हा परिषदेचे कामकाज प्रभावित झाले होते. यानंतर 23 जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास सभेला सुरुवात झाली.
नेहमी प्रमाणे मंचावर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभापती तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांची जागा नियोजित होती. परंतु कृषी सभापती रुपेश कुथे यांनी मंचावरील खुर्चीचा त्याग करीत सर्व सामान्य सदस्यांमध्ये बसण्याला पसंती दाखविली. दरम्यान जिल्हा परीषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती रुपेश कुथे यांना मंचावर बसण्याचा आग्रह धरला. मात्र कुथे यांनी अखेरपर्यंच आपली जागा सोडली नाही.
सभेला सुरुवात होताच कृषी सभापती रुपेश कुथे यांनी प्रश्नांचा भडीमार केला. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कसला विकास करीत आहात? सवाल त्यांनी केला. आपण विकासकामांच्या वाटपात भेदभाव करीत आहात, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या राजकारणाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करीत आहात, अशा आरोपांच्या फैरी झडल्या.
सभागृहातून निघून गेले
यामुळे सभागृह चांगलेच दणाणले. सत्ता पक्षातच आलबेल नसल्याचे समोर आले. दरम्यान जिल्हापरिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. कुथे यांनी जवळपास अर्धातास प्रश्नांची भाडीमार केला. त्यानंतर ते सभागृहातून निघून गेले. यानंतर पुन्हा कृषी सभापती कुथे हे सभागृहात दाखल झाले. जेव्हा पाण्याची टंचाई होती तेव्हा बोअरवेल खोदकाम करण्यात आले नाही. आता खोदकाम करून काय दाखवित आहात, असा सवालही पुन्हा उपस्थित करीत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला.
निवडणूक आहे म्हणून
दुसरीकडे अध्यक्षांनी अनेक कामे करायची असल्याचे सांगितले. आगामी काळात आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी प्रतिक्षालयाचे बांधकाम, जिल्हा परिषदेच्या कामांच्या प्रसिद्धीसाठी फलक उभारणी, प्रत्येक तालुक्यात एक मॉडेल अंगणवाडी तयार करणे यासारखी अनेक कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करायची आहेत, असे त्यांनी सांगितले. असे असले तरीही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्तापक्ष योजनांची घोषणा करीत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.