Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या नाकाबंदी सुमारे सहा कोटी रुपयांचे सोने-चांदी पकडण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अडवलेल्या एका वाहनात हे साहित्य आढळले. पकडण्यात आलेल्या सोने आणि चांदी संदर्भात कोणतीही कागदपत्र नसल्याने पोलिसांनी हा साठा जप्त केला आहे. नाकाबंदीदरम्यान यापूर्वी पुणे आणि सांगली मध्ये ही मोठ्या प्रमाणावर रक्कम आणि सोने पकडण्यात आले होते. त्या पाठोपाठ आता अमरावतीमध्येही अशी कारवाई करण्यात आली आहे.
वरखेड फाट्यावर कारवाई
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वरखेड फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. तिवसा पोलिसांना एक वाहन नागपूरहून अमरावतीकडे येत असल्याचे आढळले. पोलिसांनी वाहन थांबवले त्यावेळी त्या तीन जण होते. वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी आढळली. वाहनामधील तीनही व्यक्तींपैकी कोणाजवळही या सोन्या चांदीचे कोणतेही कागदपत्र नव्हते. पोलिसांनी बिलाची मागणी केल्यानंतर देखील वाहनातील तिघेही बिल सादर करू शकले नाही.
वरिष्ठांना माहिती
नाकाबंदीदरम्यान पकडण्यात आलेल्या साठ्याची माहिती पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी वरखेड फाट्यावर दाखल झाले. या संपूर्ण कारवाईची चित्रीकरण करण्यात आले. तपासणीमध्ये वाहनात चार किलो सोने आणि चांदी आढळली आहे. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी तूर्तास कोषागारात जमा केला आहे. सोने चांदीची वाहतूक करणाऱ्या लोकांना अधिकृत कागदपत्र सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या सोन्या-चांदीबाबत आत्ताच ठामपणे काही सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्यामध्येही अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचा साठा पकडण्यात आला होता. मात्र संबंधित कंपनीने सोने चांदीच्या अधिकृत खरेदी विक्रीची कागदपत्र सादर केल्याने नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली. अमरावती पोलिसांनी पकडलेला हा साठा कोणाचा आहे, याचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी पकडलेल्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारावर तपासाला सुरुवात केली आहे. वाहनामध्ये असलेल्या तीन जणांची माहिती ही पोलीस गोळा करीत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.
शंका. .
मतदारांना प्रभावित करण्यासाठी रोख रक्कम, मद्य किंवा अन्य साहित्याची वाहतूक होऊ शकते. अशी वाहतूक होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या सीमावर्ती भागामध्ये नाकाबंदी सुरू आहे. याशिवाय सर्व जिल्ह्यांच्या सीमेवरती देखील पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. पोलिसांच्या पथकांसोबत निवडणूक विभागाचे अधिकारी देखील तैनात करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हवालाच्या माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण होण्याची शक्यता असते. या सर्व वाहतुकीवर सध्या पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे.