Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. त्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. परिणामी बाजारातही चैतन्य आले आहे. रावेर मतदारसंघात सध्या निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. स्थानिक उमेदवार, स्थानिक मतदार यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. या पोटनिवडणुकीमुळे आर्थिक चक्रही गतिमान झाले आहे.
रावेर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. जळगाव जिल्ह्याचे सध्याचे तापमान पाहता गर्दी जमणे अवघड आहे. हे पाहून राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शनासाठी शहरातील झोपडपट्टी, ग्रामीण भागातील मजुरांना साद घातली. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन व एका दिवसाचे 300 ते 400 रुपये रोजंदारी देण्यात आली. त्यामुळे हजारोंना रोजगार मिळाला. तसेच प्रचाराची मुदत संपेपर्यंत होणाऱ्या सभा, रॅलींच्या निमित्तानेही या मजुरांना रोजगाराची संधी चालून आली आहे.
सध्या अनेकांना या निवडणुकीमुळे रोजगार मिळवून दिला आहे. मागील सात-आठ दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि इतर कामकाजासाठी मनुष्यबळ वाढले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे मजूर वर्गासह प्रिंटिंग व्यावसायिक, स्पिकर, मंडप, फेटेवाला, केटरिंग व्यावसायिक, रिक्षा व्यावसायिक, फूल व्यावसायिक आदींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्या माध्यमातून बाजारातही उलाढाल वाढली आहे.
प्रचारासाठी भाडोत्री कार्यकर्त्यांची फौज
प्रचार रॅलीत गर्दी दिसावी, प्रचारपत्रक वाटप करणे, मतदारांच्या वोटर स्लिप घरोघरी पोहोचवणे. यासाठी विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रोजंदारीवर महिला व पुरुषांना घेतले जात आहे. यामध्ये पक्षाची पट्टी गळ्यात टाकायची अन् घोषणा देणे व मागे फिरणे एवढेच काम करावे लागत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळेची मर्यादा असते. काहीजण मध्येच रॅलीत केवळ फिरणे एवढेच काम असते.
उमेदवाराकडून नास्ता आणि जेवणाची सोय राहत असल्यामुळे उत्साहात सहभागी होत आहेत. तर, काहीजण मध्येच कलटी मारून निघून जात असतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना त्यांना परत आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुसरीकडे दररोज सकाळी सकाळी शहरातील विविध भागांतील गजबजून असणारे मजूर अड्डे सध्या मात्र सुनेसुने दिसत आहेत. दररोज मजुरी काम करून मिळणाऱ्या पैशापेक्षा निवडणुकीत प्रचार करून अधिक पैसे मिळत असल्याने इतर कामांना मजूर मिळत नाहीत. दररोज मजुरी करणाऱ्यांना प्रचारासाठी न्यावे लागत आहे. त्यामुळे कामावर मजूर दांड्या मारत आहेत. अनेक ठेकेदार यामुळे कमालीचे हैराण झाले आहेत. बेरोजगार तरुणांचा कल सध्या प्रचार रॅलीतील कामात असल्याचे दिसून येत आहे.
Lok Sabha Election : चिन्हांची देखील भाऊगर्दी, मतदारांसमोर संभ्रम
मंडप, खुर्चीसाठी बुकिंग
विविध उमेदवारांनी जागोजागी प्रचार कार्यालय थाटल्याने मंडपवाल्यांना चांगले दिवस आले आहेत. याशिवाय दररोज कुठे ना कुठे कॉर्नरसभा, जाहीरसभा यामुळे माइक सिस्टिम, खुर्च्या, स्टेज, डेस्क, लाइट यांची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स चालकांची सध्या आनंदाचे वातावरण आहे.