Satara : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांच्या सहाय्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखं आज आपल्या समोर आहेत. त्याचे दर्शन घेण्याची संधी सर्वांना मिळत आहेत. हा दिवस केवळ सुधीर मुनगंटीवार यांच्या कष्टामुळे उजाडला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. त्याचवेळी वाघनखांचे दर्शन म्हणजे शिवकाळाचे दर्शन ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
शुक्रवारी (ता. 19) सातारा येथे शस्त्रांच्या कवायतीसह ‛शिवशस्त्रशौर्यगाथा’ हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत वाघनखं दर्शनासाठी खुली करण्यात आली. यावेळी शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, शंभुराज देसाई यांचीही उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा धडाडीचे मंत्री असा उल्लेख केला. ‘ व्हिक्टोरिया संग्रहालयाचे निकोलस मर्चंट यांच्याबद्दल जास्त बोललं तर वाघनखं जास्त काळ आपल्याकडे राहू शकतील’, असंही ते मिश्कीलपणे म्हणाले.
तमाम मराठी मनं आज सुखावली आहेत. जल्लोष आहे, उत्साह आहे. बाहेरही चेहऱ्यांवर आनंद पाहायला मिळाला. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली. सुधीरभाऊंना धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण त्यांनी अगदी वेळेवर ही वाघनख आणली. सरकारने दिलेला शब्द आपण पाळला. आज वाघनखांचं प्रत्यक्ष दर्शन आपण येथे घेतोय याचा अभिमान आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सुधीरभाऊंची प्रचंड मेहनत
उद्यापासून छत्रपती महाराजांच्या वाघनखांचं नाही, तर त्यांच्या शुरतेचं विरतेचं दर्शन होणार आहे. आम्ही देखील आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर महाराजांचे मावळे म्हणून आलो आहोत. शेकडो मैल प्रवास करून वाघनखं दाखल झाली आहेत. सुधीर भाऊंनी लंडनला जाऊन करार केले. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. मी तमाम जनतेच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हा तर महाराजांचा अपमान
काही लोक शंका व्यक्त करत आहेत. ते चुकीचं आहे. महाराजांनी अफजलखानाचा कोथळा याच वाघनखांनी बाहेर काढला. काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं. चागल्या कार्यक्रमांना गालबोट लावायचं असतं. वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे महाराजांच्या शुरतेचा विरतेचा अपमान करणे आहे. खरा शिवभक्त हे कधीही सहन करणार नाही, या शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
अतुलनीय शौर्य
हा सगळा परिसर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्साने पवान झालेला आहे. ३६५ वर्षांचे अंतर आपण पार केले. महाराजांनी अतुलनीय शौर्य पराक्रम गाजवला. प्रतापगडाच्या पायथ्याशी दगाबाज अफजलखानाचा कोथळा हीच वाघनखं खुपसून बाहेर काढला होता. यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. हिंदवी स्वराज्यात हा मानाचा तुरा होता. ही वाघनखं पाहिल्यावर छाती अभिमानानं भरून आल्याशिवाय राहात नाही, असंही ते म्हणाले.
हे तर आपलं भाग्य
महाराजांनी ३५ वर्षात ३५० वर्षाचं पारतंत्र्य उखडून फेकलं. मावळ्यांच्या साथीने आदीलशाही, निजामशाही, मोघल, पोर्तुगीज, फ्रेंज अशा परकीयांनाही जरब बसवली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असा दंडक महाराजांनी घालून दिला. स्वराज्य हा त्यांचा ध्यास होता. जगभरातील विद्यापीठांमध्ये युद्धकला म्हणून गनीमी कावा शिकवला जातो. आपण भाग्यवान आहोत, कारण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित आपण जन्म घेतला, असेही ते म्हणाले.
आम्ही तिघांनी ठरविले की
शिवरायांना अभिप्रेत असलेल्या राज्याचे स्वप्न आपण साकार करतोय, हे फडणवीसांनी, मुनगंटीवारांनी सांगितले. आपण जे करतो, ते सर्वसामान्य जनतेसाठी. म्हणूनच आता या योजना आपण आणल्या. शेतकरी, महिला यांच्यासाठी योजना केल्या. त्यावर विरोधक आक्षेप घेत आहेत. योजनेचे पैसे त्यांच्या त्यांच्या खात्यात वेळेत पोहोचतील. आम्ही तिघांनी एकदा ठरवलं की करूनच दम घेतो. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत
फडणवीस यांनी बुद्धीवर चढलेली बुरशी काढण्याची सूचना केली. सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखं दिली आहेत. पण चिंता करू नका, मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत. आणि तोंड उघडून सांगताही येत नाहीत. त्यामुळे योग्य वेळी त्यांच्या बुद्धीवरची बुरशी मी काढेन, असेन मुख्यमंत्री म्हणाले.