महाराष्ट्र

Assembly Election : बोले तैसा न चाले… म्हणे आमचे व्हावे भले!

BJP vs congress : भाजपच्या यादीत घराणेशाही भारी; बायको, मुलगी, भावाला उमेदवारी

या लेखातील मते लेखकाची आहेत, या मतांशी लोकहित सहमत असेलच असे नाही

Maharashtra politics : भाजपने राजकारणातील घराणेशाहीला सतत विरोध केला आहे. काँग्रेस आणि समाजवादी या पक्षांवर याच मुद्यावरून अनेकदा टिकाही केली आहे. घराणेशाहीमुळे एकाच कुटुंबाकडे सत्ता केंद्रीत होते. या भूमिकेची झळ निष्ठावंत नेत्यांना व कार्यकर्त्यांना बसते. त्यांच्यावर अन्याय होतो, असे मत भाजपचे नेते सातत्याने मांडताना दिसतात. अलीकडेच वाराणसी येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर तीव्र शब्दांत टीका केली. घराणेशाही हा राजकारणाला मोठा धोका असल्याचे ते म्हणाले. या घराणेशाहीची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. कोणताही पक्ष त्यास अपवाद नाही. अगदी भाजपही त्याच पावलांवरून वाटचाल करीत आहे.

घराणेशाहीचा पगडा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. प्रमुख पक्ष उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करीत आहेत. भारतीय जनता पक्षाने यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली. या यादीत प्रभावी राजकीय घराण्यांना झुकते माप देण्यात आले आहे. निष्ठावंत आमदारांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हक्काने उमेदवारी मिळाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचा पगडा आहे.

भाजपने आपल्या पहिल्या यादीत निष्ठावंतांना प्राधान्याने स्थान दिले आहे. तुरळक अपवाद वगळता कुणाचेही तिकीट कापले नाही. काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीत १३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. ४ अनुसूचित जातीचे तसेच ६ अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत.

काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात आले. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतले. आता त्यांची कन्या श्रीजया हिला भोकर विधानसभा मतदार संघातून आमदारकीचे तिकीट मिळाले आहे. रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना भोकरदन येथून, स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आकाश यांना खामगाव, मतदार संघातून तिकीट मिळाले. बबनराव पाचपुते यांच्या परिवारावर पक्षाची मेहेर नजर आहे. त्यांच्या पत्नीला श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

धमकी

पक्ष सोडण्याची धमकी देत दबावतंत्राचा वापर करणारे गणेश नाईक यांना ऐरोलीमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र मंदा म्हात्रे यांचे तिकीट कापून बेलापूर मतदारसंघ मिळविण्यात ते अयशस्वी ठरले. मागील विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांचे तिकीट पक्षाने कापले होते.‌ विनोद तावडे केंद्रात पक्षाचे सरचिटणीस झाले. आता बावनकुळे यांना कामठी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापण्यात आले.लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक राहूल नार्वेकर यांना तिकीट मिळाले नव्हते. आता ते कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

BJP Politics : आठ विद्यमान आमदार वेटिंगवर

जेष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील कोथरूडची जागा लढणार आहेत. रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले राम शिंदे कर्जतची जागा लढणार आहेत. चिंचवड येथील जागा अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दिर शंकर जगताप लढविणार आहेत. भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांचे बंधू विनोद शेलार मालाड येथून निवडणूक लढविणार आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे.भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक दक्षिण कोल्हापूरच्या जागेवर लढणार आहेत.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा नातू संभाजी पाटील निलंगेकर निलंगा मतदार संघातून भाजपतर्फे निवडणूक रिंगणात आहे. कल्याण पूर्व मतदार संघातून निवडून आलेले गणपत गायकवाड तळोजा कारागृहात आहेत. त्यांना अजून जामिन मिळालेला नाही. या जागेवरून आता त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. याच मतदारसंघातून शिवसेना शिंदे सेनेचे महेश गायकवाड निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ते कोणती भूमिका घेणार यावर बरेच काही अवलंबून आहे. वरळी आणि शिवडी मतदारसंघ लढविण्यास शिंदे गट आग्रही असल्याचे बोलले जाते. या जागा मनसेसाठी सोडण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जाते. शिवडी येथून बाळ नांदगावकर तर वरळी येथून मनसेचे संदीप देशपांडे निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत.

राजकीय वारसा चालविण्याचा अट्टाहास

उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपने घराणेशाही जोपासली आहे. निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन तिकीट वाटप करण्यात आले असे सांगण्यात येते. प्रस्थापित राजकीय घराणे राजकीय वारसा चालवण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. आपले सगेसोयरे आणि नातेवाईक या पलीकडे त्यांची दृष्टी गेलेली नाही. आपल्या वर्चस्वाला कोणी धक्का लावणार नाही याची दक्षता सतत घेतली. त्यामुळे नवे नेतृत्व उदयास येऊ शकलेले नाही. प्रत्येक पक्ष आणि त्यांचे नेते आपला राजकीय वारसा पुढे कसा चालेल. हाच विचार करतांना दिसतात. भाजपच्या यादीत घराणेशाही भारी पडल्याचे स्पष्ट पणे दिसून येते. राजकारणात असं बोलायचं असतं, जे बोलतो तसे वागले चे पाहिजे असा कुठलाही नियम नाही असा अर्थ यादी वरून काढला जाऊ शकतो.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!