Shikshan Manch : कोणतेही संवैधानिक पद नसतानाही विद्यापीठाच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करणाऱ्या शिक्षण मंचाच्या अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गेली 20 वर्षे व्हीएमव्ही कॉलेजमध्ये हिंदीच्या शिक्षिका असलेल्या डॉ. सोनू जेसवानी यांनी केली आहे. जेसवानी यांनी पत्रकार परिषदेत डॉ. पांडे यांच्यावर अनेक आरोप केले. नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेत घेत डॉ. पांडे यांच्यावर निशाणा साधला.
डॉ. जेसवानी म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी विषयाचे आपण संशोधन संचालक आहोत. आपले जीवन विद्यार्थ्यांच्या कल्याण आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी समर्पित केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निलंबनाला डॉ. कल्पना पांडे याच पूर्णपणे जबाबदार असल्याचेही डॉ. जेसवानी यांनी नमूद केले. डॉ. पांडे या विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या पी.एचडीचे ऑनलाइन अहवाल थांबविणे, प्राध्यापकांना ब्लॅकमेल करणे, कंत्राटी प्राध्यापकांच्या पगारातून रक्कम कापून स्वत:च्या खिशात टाकण्यासारखे प्रकार डॉ. पांडे करीत असल्याचे डॉ. जेसवानी म्हणल्या.
अनुभवी लोकांना डावलले
अनुभवाचा प्राधान्यक्रम पूर्णपणे नाकारून कनिष्ठ प्राध्यापकांना कॉलेज ऑडिट कमिटीत पाठविण्यात येत आहे. या प्रकारांमध्ये डॉ. पांडे याचा सहभाग असल्याचेही त्या म्हणाल्या. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे डोळे मिटून डॉ. कल्पना पांडे यांची प्रत्येक गोष्ट मान्य करीत होते, असा आरोपही डॉ. जेसवानी यांनी केला. धवनकर प्रकरण आणि मनोज पांडे प्रकरणाच्या फाइल्स उघडकीस आल्यास मोठा गैरप्रकार समोर येईल, असा दावाही त्यांनी केला. पांडे या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नावाचा गैरवापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉ. जेसवानी यांनी पांडे यांना जाहीर प्रश्नही विचारले आहेत. सेवानिवृत्तीनंतरही केवळ 11 वर्षांचा वरिष्ठ महाविद्यालयाचा अनुभव असतानाही पांडे स्वत: महाविद्यालयाचे ऑडिट करण्यासाठी समित्यांकडे जातात. 15 ते 20 वर्षांचा अनुभव असलेल्या प्राध्यापकांना डावलून हा प्रकार का केला जातो. व्हीएमव्ही महाविद्यालयात घडलेल्या लाचलुचपत प्रकरणाचे काय झाले?
डॉ. जेसवानी यांनी आपल्याकडील हिंदी विषयाची गाइडशिप काढण्यात आल्याचा प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले. विद्यापीठातून हिंदी पीएच.डी. संबंधित आरएसी समितीच्या सदस्यत्वातून त्यांना काढून टाकण्यात आले. विदयापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाच्या सदस्य पदावरूनही त्याचे नाव कमी करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या वाणिज्य भाषा अभ्यास मंडळाच्या यादीतूनही त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. विद्यापीठ वार्षिक पुस्तक निर्णय समितीमधूनही त्यांना काढण्यात आले. आपण यासंदर्भात पोलिसांकडे केली, परंतु कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही डॉ. सोनू जेसवानी पत्रकार परिषदेत केली.