महाराष्ट्र

Chandrapur Constituency : आता डॉक्टरांनाही पडली राजकीय ग्लॅमरची भुरळ !

Assembly Elections : कोरोना काळात जमवलेल्या 'माया'ची ताकद

Doctor Candidate : वैद्यकीय क्षेत्र म्हणजे एक सो कॉल्ड व्हाईट कॉलर आणि अत्यंत प्रतिष्ठित समजले क्षेत्र. सामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील लोकांना डॉक्टर म्हणजे देवदूतच वाटत असतो. त्यामुळे वैद्यकीय व्यवसायाला समाजात एक चांगली प्रतिष्ठा आहे. इतकी प्रतिष्ठा मिळत असतानाही डॉक्टरांना राजकीय ग्लॅमरची भुरळ पडली आहे. अनेक डॉक्टर राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी धडपड करताना दिसतात.

गेल्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेली स्पर्धा, कट प्रॅक्टिसचा झालेला भांडाफोड, आरोग्यवस्थेवर असलेला ताण, या ताणातूनच वाढत चाललेले डॉक्टरावरील हल्ले आणि या क्षेत्रातही आता प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. शिवाय सततचा कामाचा ताण यामुळे आता प्रस्थापित डॉक्टरांना या क्षेत्रात थांबावे वाटेनासे झाले आहे. शिवाय कोरोना काळामध्ये अनेक डॉक्टरांनी कमविलेली माया हीसुद्धा आता या डॉक्टरांना राजकीय क्षेत्राकडे वळण्याची दिशा दाखवत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

या पृष्ठभूमीवर गेल्या काही वर्षांमध्ये मात्र या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनाही आता राजकीय ग्लॅमरची चांगलीच भुरळ पडताना दिसून येत आहे. राजकीय क्षेत्रात दिसत असलेले ग्लॅमर पाहून आता अनेक डॉक्टरांनाही आपणही आमदारकीकडे वळावं, असे स्वप्न पडायला लागले आहेत. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हे चित्र दिसत आहे.

Assembly Elections : डॉक्टरांना व्हायचेय आमदार!

डॉक्टरांची लिस्ट

बल्लारपूर विधानसभेमध्ये डॉक्टर अभिलाषा गावतुरे, डॉक्टर विश्वास झाडे, डॉ. अमोल पोद्दार हे तीन डॉक्टर सध्या निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे. यांपैकी डॉक्टर अमोल पोतदार यांनी 2009 मध्ये बसपातर्फे निवडणूक लढवली होती. 10,245 मते घेत चौथ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावे लागले होते. डॉक्टर विश्वास झाडे यांनी मागील 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून लढत देत 52,762 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. विश्वास झाडे यांचा तब्बल 33,240 मतांनी पराभव केलेला होता. डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केली आहे. आता त्या काँग्रेसच्या प्रबळ दावेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी उत्सुक आहेत. वरोरा विधानसभा मतदारसंघांमध्येसुद्धा डॉक्टर आसावरी देवतळे, डॉक्टर विजय देवतळे, डॉ. अनिल बुजोणे , डॉक्टर हेमंत खापणे, डॉक्टर चेतन खुटेमाटे असे वैद्यकीय क्षेत्रातील मातब्बर आता विधानसभेकरिता निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहात आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर झेप

डॉक्टर अनिल बुजोणे यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढत 30,982 मतं घेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. तर 2014 च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अनिल बुजोणे यांनी मनसेकडून उमेदवारी मिळवत 7,981 मतं घेत पाचव्या क्रमांकावर राहिले होते. डॉक्टर आसावरी देवतळे यांनी 2014 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत 31,033 मते घेत तिसऱ्या क्रमांकापर्यंत चढाई केली होती.

डॉक्टर असावरी देवतळे यांना आता 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी मिळू नये, यासाठी निलंबित करण्यात आलेले असल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. असे असले तरीही त्यांनी मुंबई येथे जाऊन 2024 च्या विधानसभा निवडणुकीकरिता वरोरा विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी मागितली आहे. एकूणच राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आता उच्चविद्याविभूषित असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनाही आपण आमदार व्हावे, असे वाटायला लागले आहे. परिणामी राजकारणाचा चेहरा बदलणार का, हा प्रश्न चर्चिला जात आहे.

चर्चा ही चर्चा

उच्चविद्याविभूषितांमुळे राजकारणाला एक चांगले वळण, एक चांगली दिशा मिळेल का, अशीही चर्चा आता या निमित्ताने कानावर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये तरुणांनी राजकारणात यावे, असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आता कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले तरुण राजकारणाच्या क्षेत्रात येतील का, याची चर्चा चालू आहे. चांगले आर्थिक पाठबळ असलेले उच्चविद्याविभूषित डॉक्टर मंडळी राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करू पाहत आहेच. याला आता मतदार कशा पद्धतीने स्वीकारतात , याचे उत्तर विधानसभेच्या उमेदवारी वाटपावरून व त्यानंतर येणाऱ्या निकालांतूनच कळणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!