या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असं नाही.
Power Play : महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरले. उमेदवारांच्या नावांची घोषणाही झाली. उमेदवार देताना अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आले. दोन्ही बाजूंनी नाराजीचा सूर उमटायला लागला. त्यातील काही जणांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील मित्र आता एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले आहेत. आता ही बंडखोरी थोपवावी कशी? असा प्रश्न सत्ताधारी आणि विरोधकांसमोर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास त्याचे थेट परिणाम अधिकृत उमेदवारांवर होण्याची भीती आहे.
विविध मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना महायुतीत नेते मंडळींचा वरचष्मा दिसतो. पक्षाच्या वरीष्ठ नेते मंडळींनी आपले उमेदवार समोर केले. त्यांना योग्य वाटेल त्यांनाच उमेदवारी दिली. महायुतीमध्ये असा प्रकार जास्त बघायला मिळत आहे. मतदारसंघातील निष्ठावंतांचे मत आणि जनभावना याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. ज्यांना मागणी करुनही उमेदवारी मिळाली नाही, ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. अशा उमेदवारांमुळे मत विभागणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
अनेक धास्तावलेले
विजयी होण्याचा विश्वास असणारे अनेक उमेदवार या बंडखोरीच्या प्रकाराने धास्तावले आहेत. अशाच प्रकारचा अनुभव महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) घेत आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. राज्यातील निवडणुकीत सर्व पक्षांना यंदा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाऊन मार्ग शोधावा लागत आहे. स्पर्धा आणि चूरस प्रत्येक मतदार संघात बघायला मिळत आहे. उमेदवारांची गर्दी, बंडखोरी, पाडापाडीचे राजकारण यामुळे कुठे नेमके काय होणार? याचा अंदाज बांधणेही कठीण होऊन बसले आहे.
बंडखोरीचे तडे
तिकीट जाहीर होण्याच्या चार ते पाच दिवस आधी काही उमेदवारांनी पक्ष बदलले. प्रवेश केल्यावर त्यांना लगेच उमेदवारी मिळाली. सहाजिकच त्या त्या पक्षातील जुने आणि निष्ठावंत नेते, कार्यकर्ते दुखावले गेले. आता ही मंडळी समोरच्याला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या (BJP) काचेच्या महालाला बंडखोरीचे तडे जायला सुरुवात झाली आहे. जवळपास सहा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. चार मतदारसंघात महायुतीच्या दोन पक्षांचे उमेदवार मैत्रीमध्ये एकमेकांचा काटा काढताना दिसत आहेत.
मोठी रस्सीखेच
बोरीवली मतदारसंघात भाजपने माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापले. तिथे संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. ते स्थानिक नसल्याचा गोपाळ शेट्टी यांचा आरोप आहे. ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात महायुतीने रवी राणा यांना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे. भाजपाचे निष्ठावंत तुषार भारतीय अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना गटाने प्रीती बंड यांच्याऐवजी सुनिल खराटे यांना उमेदवारी दिली. बंड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात ‘प्रहार’नेही उमेदवार दिला आहे. येथील निवडणूक रंगतदार, उत्सुकता वाढविणारी ठरणार आहे.
विजय अग्रवाल यांच्या रुपाने भाजपने अकोला पश्चिममध्ये उमेदवार लादला. आता या जागेच्या उमेदवारीचे दावेदार हरीश अलिमचंदानी अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. ‘प्रहार’ने डॉ. ओळंबे यांना उमेदवारी देऊन मतांचे गणितच विस्कटून टाकले आहे. काँग्रेस आणि ‘वंचित’ने मुस्लिम उमेदवार दिले आहेत. या मतदारसंघातील परिस्थितीचा वेध न घेता महायुतीने उमेदवार जाहीर केला. नेत्यांनी घेतलेला हुकुमशाहीमय निर्णय असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. असे निर्णय विजयाच्या आशा धुसर करतात. सांगली मतदारसंघात अशीच काहीशी स्थिती आहे.
धडा घ्यायला हवा
मतदारसंघात चुकीचे उमेदवार दिल्याने काय विपरीत घडू शकते, याचा अनुभव महायुतीने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) घेतला आहे. अमरावती, वाशीम आणि हिंगोली येथील जागा अशाच हातून निसटल्या. आणखी काही मतदारसंघात असेच चित्र बघायला मिळाले. त्यातून महायुतीने कोणताही धडा घेतलेला नाही. उमेदवार लादण्याच्या प्रकारास चाप बसलेला नाही. विधानसभा निवडणूक आता सोपी राहिलेली नाही. मोठ्या पक्षांच्या शर्यतीत छोटे पक्ष भाग्य आजमावण्यासाठी पुढे सरसावत आहेत. नवीन आघाड्यांची आव्हाने आहेतच. जात, आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा चालविणाऱ्या व्यक्ती व नेते वेगळीच नीती ठरवित आहेत. नेमके काय होईल? याचा वेध कोणीच घेऊ शकत नाही. अशात अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी मोठ्या पक्षांची झोप उडविली आहे.