Maharashtra Assembly Election : निवडणूक घोषित होताच प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांची इनकमिंग, आउटगोईंग सुरु झाली आहे. याचा फटकाही पक्षांना सहन करावा लागत आहे.असाच प्रकार भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात सुरु झाला आहे. निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून दिलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेसला आता प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा थेट परिणाम काँग्रेसला भोगावा लागत आहे. सध्या पक्षात नाराज कार्यकर्त्याची ऑउटगोइंग सुरू झाली आहे. आता आउटगोइंग झाली तर कुठे इनकमिंग होणारच. या नाराजीचा फायदा न घेणार ते भोंडेकर कसे? हे सर्व नाराज कार्यकर्ते आता शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करू लागले आहेत.
धडपड सुरू
निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी झाली. पक्षासाठी कित्येक वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इच्छा निवडणुकीच्या काळात बळवतात. पक्षाची उमेदवारी आपल्याला किंवा आपल्या सहकाऱ्याला मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरावा, यासाठी अनेकांची धडपड असते. अशा निष्ठावंतांना डावलून दिली जाणारी उमेदवारी पक्षासाठी घातक ठरू शकते. त्याचा थेट परिणाम पक्षगळतीच्या रुपात होते. दोन दिवसांपूर्वी महिला काँग्रेसच्या जिल्हा महासचिव माधुरी तलमले, महेश नान्हे आणि अन्य लोकांचा झालेला प्रवेश बरेच काही सांगून जातो.
माजी जिल्हाध्यक्ष रिंगणात
सर्व घडामोडीत पक्षाचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीरही शेवटच्या दिवशी 29 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. गणवीर सुद्धा उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळणार आहेत. अनेक वर्षापासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले गणवीर आता काँग्रेस विरुद्ध ‘बगावत’ करताना दिसत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी न देता प्रदेशाध्यक्ष यांच्या खासगी संघटनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देणे हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. प्रेमसागर गणवीर यांना काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
नाना साठी अडचण
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची खरी कसोटी आता लागणार आहे. भंडारा त्यांचा गृहजिल्हा आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यात उफाळून आलेली बंडखोरी त्यांना शांत करावी लागणार आहे. त्यातून नाना आता या बंडखोरीला शांत करण्यासाठी काय उतारा देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र या सर्व घडामोडी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना काँग्रेस कार्यकर्त्यांची लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे. प्रेमसागर गणवीर यांच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसणार की त्याचा फायदा भोंडेकर यांना होणार हे आता लवकरच दिसणार आहे. मात्र या सगळ्या धावपळीत कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एक झेंडा टाकून दुसरा झेंडा हाती घ्यावा लागत आहे.