Mahavikas Agadi : नागपूर : दक्षिण नागपूरच्या जागेवर काँग्रेसकडून अनेक इच्छुक सरसावले आहेत. आपापल्या पद्धतीने प्रत्येकाने फिल्डिंग लावली आहे. मात्र या जागेवरून महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे घोडे अडले आहे. प्रमोद मानमोडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी उद्धवसेनेतील एक गट फारच आग्रही आहे. परिणामी काँग्रेसमधील इच्छुकांना घाम फुटला आहे.
अफवा
आधीच संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती असताना शुक्रवारी ही जागा उद्धवसेनेला गेल्याची अफवा पसरली. इच्छुकांपैकी एक असलेले गिरीश पांडव यांच्या समर्थकांनी तातडीची बैठक बोलविली. या बैठकीत नाराजीचा सूर उमटणार असल्याचीच चिन्हे असताना अद्याप या जागेबाबत काहीही निर्णय झाला नाही असा वरिष्ठ पातळीवरून निरोप आला.
शेवटी नाराजीच्या बैठकीचे रुपांतर नियोजन बैठकीत झाले. मात्र हा फक्त ट्रेलर होता. जागा खरोखरच उद्धवसेनेला गेली तर महाविकासआघाडीतूनच येथे बंडखोरी होईल याचेच संकेत यातून मिळाले आहेत. दक्षिण नागपूरची जागा उद्धवसेनेला सुटली, असे समजताच काँग्रेस कार्यकर्ते संतापले. दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल अत्यंत महत्त्वाची बैठक बाकडे सभागृह, मानेवाडा रोड येथे सायंकाळी ४ वाजता बोलाविण्यात आली.
या बैठकीला प्रदेश काँग्रेस, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, ब्लॉक काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेससह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मॅसेजेस गेले. पांडव यांचे समर्थक वेळेत पोहोचले. मात्र वरिष्ठ पातळीवरून याची गंभीर दखल घेण्यात आली व अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत प्रत्यक्षात उद्धवसेनेच्या उमेदवारीला विरोध करायचा असाच अजेंडा होता. मात्र वेळेवर बैठकीचा सूर पालटण्यात आला.
Assembly Election : भाजपला उत्तर नागपुरात ‘चमत्कारा’ची अपेक्षा!
मानमोडेंसाठी फिल्डिंग?
उद्धव ठाकरे गटाने प्रमोद मानमोडे यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. दक्षिण नागपूरमधून मानमोडे विजय खेचून आणतील असा विश्वास ठाकरे गटाला आहे. मात्र गेल्या निवडणुकीचा अंदाज घेतला तर मानमोडेंचे कठीणच आहे. 2019 मध्येही प्रमोद मानमोडे रिंगणात होते. निकालाअंती ते सातव्या क्रमामांकावर होते. त्यांना 4 हजार 274 मते पडली होती. बँक आणि सहकारी संस्थेच्या निमित्ताने त्यांचे कार्यक्षेत्र नागपूरभर आहे. पण निवडणुकीत त्यांना मतदारांनी नाकारलेच आहे. शिवाय त्यांना एका प्रकरणात तुरुंगात देखील जावे लागले होते. अर्थात यावेळी चित्र वेगळे असले तरीही मानमोडे अख्खा मतदारसंघ काबीज करतील, याची शक्यता कमीच आहे.