पश्चिम नागपूरमध्ये रेशन फॉर व्होटचा प्रकार समोर आल्यानंतर वातावरण तापले आहे. यावरूनच काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे व अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्या समर्थकांमध्ये सोमवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला. यानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणामुळे अवस्थीनगर चौक परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ऐन निवडणूकीच्या कालावधीत अशा प्रकारचा प्रकार झाल्यामुळे सुरक्षायंत्रणांनी ही बाब गंभीरतेने घेण्याची गरज होती. मात्र केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
पश्चिम नागपुरातून विकास ठाकरे यांच्याविरोधात जिचकार निवडणूक लढत आहेत. जिचकार यांची प्रचारपत्रके असलेल्या रेशन बॅग्ज जप्त झाल्यामुळे ते वादात सापडले आहेत. ठाकरे समर्थकांनीच संबंधित गोदामांची माहिती निवडणूक यंत्रणेला दिल्याचा जिचकार समर्थकांना संशय आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार मोहिमेवरून दोघांच्या समर्थकांमध्ये अवस्थीनगर चौक परिसरात जोरदार वाद झाला.
प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. तातडीने याची माहिती गिट्टीखदान पोलिस ठाण्याला कळविण्यात आली. काही वेळातच तेथे दोन्ही बाजूंचे शेकडो समर्थक पोहोचले. अवस्थीनगर चौकात तणावाचे वातावरण असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. एका गटाने गिट्टीखदान तर दुसऱ्या गटाने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
गिट्टीखदानचे ठाणेदार कैलास देशमाने यांनी या घटनेला दुजोरा दिला. मात्र अशी घटना एरवी घडली असती तर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला असता. मात्र राजकारणाशी संबंधित घटना असल्यामुळे केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली का असा सवाल उपस्थित होत आहे.
समर्थक भिडल्यामुळेच
एका कार्यक्रमात काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित असताना विकास ठाकरे यांचे समर्थक व नरेंद्र जितकार यांच्यात धक्काबुक्की झाली. दोन्ही बाजुंचे कार्यकर्ते भिडल्यामुळे तक्रार झाली. चौकशीअंती जिचकार यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतरच जिचकार यांनी अपक्ष लढून बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही परिस्थितीत विकास ठाकरे यांचे गणीत बिघडवणार, असा निर्धारच जणू त्यांनी केला आहे. आता हा नवीन राडा कुणासाठी धोकादायक ठरेल, हे वेळच सांगेल.