Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात एकमेकांवर मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू आहेत. अशात उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांची खिल्ली उडवत टीका केली आहे. ‘अजित पवारांनी गुरढोरं बघत शेती सांभाळावी. राजकारण सोडून द्यावे’ असा उपरोधिक सल्ला जानकर यांनी दिला. त्यावर अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी जानकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. उत्तमरावांनी बारामतीमध्ये यावं, अजितदादांच्या फॉर्म मध्ये 55 गाईंचा मुक्त गोठा आहे. सध्या गायींची देखभाल करायला एका माणसाची जागा रिक्त आहे. त्यासाठी जानकर ‘उत्तम’ माणूस आहेत, असे उत्तर मिटकरींनी जानकर यांना दिले.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाची एकही संधी सोडताना दिसत नाही. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडले. लोकसभा निवडणुकीत अजितदादा यांची साथ सोडली. उत्तम जानकर यांनी माढा, सोलापूर आणि बारामतीमध्ये जोरदार प्रचाराची राळ उडवली. धनगर समाजाची मोठी ताकद राष्ट्रवादी शरद पवार यांच्यामागे उभी केली.
जानकर ठरले ‘उत्तम’
निवडणुकीत उत्तम जानकर यांनी त्यांच्याच पक्षात राहून उघडपणे अजितदादा यांना थेट आव्हान दिले होते. मात्र उत्तम जानकर यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस अजूनही अजित पवार गटाने दाखवलेली नसल्याचे बोलले जात आहे. गेल्या महिनाभर उत्तम जानकर यांनी जाहीर सभेतून वेळोवेळी अजित पवारांची खिल्ली उडवली. त्यांना दादा गटाकडून कधीही उत्तर देण्यात आलेले नाही. आता या नवीन टीकेला तरी अजितदादा यांचेकडून अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले आहे.
गटारीचे पाणी पिले!
उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. उत्तम जानकर म्हणाले, ‘अजित दादांना मी सांगितलं होतं की साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे. शंभर पेक्षा अधिक आमदार यावेळेस निवडून आणायचे आहेत. हे साहेबांच्या डोक्यात आहे. या संघर्षामध्ये तुम्ही सामील व्हा. अनिल देशमुख, संजय राऊत यांनी देखील जेलवाऱ्या केल्या आहे. तुम्हाला देखील आठ पंधरा दिवस जेलवारी करावी लागेल. पण संघर्षातून तुम्ही उभे रहा. परंतू त्या माणसाने शेवटी गटारीचे पाणी पिले. जे व्हायचे ते झाले’, अशी घणाघाती टीका उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर केली.
अजित पवारांनी गुरढोर बघत शेती सांभाळावी. राजकारण सोडून द्यावे, असा सल्लाही दिला होता. आता यावर अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, अजितदादांच्या फॉर्म मध्ये 55 गाईंचा मुक्त गोठा आहे. अतिशय सुंदर हा गोठा आहे. जानकर यांनी तिथे जावं आणि पाहावं. दादांचा हा जन्मजातच पिंड शेतकऱ्यांचा आहे. असे असतानाही जानकर यांनी दादांवर टीका केली आहे. मी दादांना विनंती करेल की, गोठ्यात शेण काढायला माणसे पाहिजेत असं मला कळल. उत्तम जानकर यांच्या नावाची मी शिफारस करेल. कारण गाईचं शेण काढायला यांच्यासारखा उत्तम माणूस राज्यात दुसरा कोणी नसेल असं माझं मत आहे. यापुढे दादांवर टीका करताना आपल्या जिभेला आवर घालण्याचा सल्लाही मिटकरी यांनी जानकर यांना बोलताना दिला.