महाराष्ट्र

Amravati : राणा विरुद्ध अडसूळ वाद पुन्हा चव्हाट्यावर!

Controversy In Mahayuti : अमरावतीमध्ये महायुतीत निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी

संपूर्ण राज्यासाठी चर्चेचा विषय असलेलं अमरावतीचं राजकारण पुन्हा तापलं आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगताना दिसत आहे. नवनीत राणा विरुद्ध अडसूळ वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. महायुतीतील घटकपक्ष असेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि दर्यापुरचे माजी आमदार कॅप्टन अभीजीत अडसूळ आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यातील वाद वेळोवेळी उफाळून आला आहे. अडसूळ यांनी जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघावर दावा केल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनीही त्यावर भाष्य केले. त्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

वाद पुन्हा उफाळला

लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात आनंदराव अडसूळ यांनी महायुतीतर्फे दावा केला होता. मात्र यावेळी नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. आधीच दोघांमध्ये वाद आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यात भर पडली. आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीही अडसूळ आणि राणा यांच्यातील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. कारण नवनीत राणा यांनी परत एकदा नाव न घेता कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

‘दर्यापूर मतदारसंघात आम्हाला बाहेरचे पार्सल अजिबात चालणार नाही. या मतदारसंघात केवळ कमळचाच उमेदवार निवडून येईल’, असा टोला नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांना लगावला होता. राणा यांच्या टीकेला अभिजीत अडसुळांनी जोरदार पलटवार करत थेट महायुतीलाच इशारा दिला आहे. एकदा आम्ही गप्प राहिलो, आता गप्प राहणार नाही, असे म्हणत महायुतीला अभिजीत अडसुळांनी इशारा दिला आहे.

Akola Tension : गृहराज्यमंत्री असतानाही आणू शकले नाही आयुक्तालय

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. दरम्यान या निवडणुकीत नवनीत राणा यांचा प्रचार अडसूळ पिता-पुत्रांनी केला नाही, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता विधानसभेत दर्यापूर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत आणखी वाद रंगण्याची शक्यता आहे. दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पार्सल उमेदवार चालणार नसल्याचं नवनीत राणा यांनी म्हटल्यानंतर अभिजित अडसूळ यांनीही नवनीत राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अभिजित अडसूळ यांनी दर्यापूर येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी नवनीत राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘अमरावतीच्या दर्यापूर विधानसभेची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. तरी देखील काही लोक इथे अडचणी निर्माण करत आहेत. त्यांना आम्हाला सांगायचे आहे की, एकदा आम्ही गप्प बसलो, मात्र आता गप्प बसणार नाही.’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!