Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले तर हस्तांदोलन देखील करणार नाही, एवढे टोकाचे आणि व्यक्तिगत पातळीवरील टोकाचे दोघेही एकमेकांवर करताना दिसतात. निवडणूक प्रचारात तर याची चांगलीच प्रचिती आली. पण मंगळवारी उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेले. फडणविसांनी त्यांचे अगदी हसतमुखाने स्वागत केले. या दोघांमध्ये 15 मिनिटं बंदद्वार चर्चाही झाली. आता या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीनंतर नवं काही शिजतय का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
2019 मध्ये मुख्यमंत्रिपदाच्या वादावरून युती तुटली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यानंतर दोघांमधील वाद चांगलाच ताणला गेला. अगदी एकमेकांचे तोंडही बघणार नाही, येथपर्यंत या वादाने मजल मारली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने अडिच वर्षे पूर्ण केली होती तोच शिवसेनेला खिंडार पडली. एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा मोठा पक्ष अशा पद्धतीने फुटण्याची ही पहिलीच वेळ होती. उद्धव ठाकरेंनी पक्षफुटीचे खापर फडणवीसांवर फोडले. त्यानंतर दोघांमधील राजकीय शत्रुत्व व्यक्तिगत वैमनस्यापर्यंत येऊन पोहोचले.
‘एक तर तो राहील किंवा मी’
उद्धव ठाकरे यांनी तर एका भाषणात ‘एक तर तो राहील किंवा मी’ असं विधान करून थेट धमकीच दिली होती. त्यानंतर फडणवीस यांनी देखील या धमकीला उत्तर दिलं होतं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने जोरदार कामगिरी केली. त्यामुळे त्यांना विधानसभा जिंकून सत्तास्थापनेचे डोहाळे देखील लागले होते. पण, विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित कमबॅक केले. महाविकास आघाडीला चांगलाच शॉक बसला. उद्धव ठाकरेंपासून सर्व विरोधकांनी ‘हे ईव्हीएम सरकार आहे’ अशी टीका केली. उद्धव यांनी तर सोमवारी नागपुरात येताच पहिली प्रतिक्रिया हीच दिली.
Uddhav Thackeray : विस्तारानंतर आतिशबाजीपेक्षा नाराजीचे बॉम्ब
विरोधीपक्षनेतेपदासाठी भेट?
या संपूर्ण पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री दालनात जाऊन भेट घेणे, आश्चर्याचे मानले जात आहे. उद्धव यांनी फडणवीस यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर दोघांमध्येच बंदद्वार चर्चा झाली. विधानसभेत शिवसेनेकडे सर्वाधिक 20 आमदार आहेत. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे, असे बोलले जात आहे. या पदासाठी संख्याबळाची अट नसली तरीही सरकारच्या मनात असेल त्या पक्षाला विरोधीपक्षनेतेपदाचा मान मिळू शकतो, याची उद्धव यांना चांगलीच कल्पना आहे.