Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभा निवडणूकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, याबाबत महायुतीतील शिवसेना आणि भाजप नेत्यांमधून वेगवेगळी प्रतिक्रिया उमटत आहे. महायुतींमधील अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या असताना आता शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
विधानसभेचा रंग
लोकसभा निवडणुकीत महायुतीवर वरचढ ठरल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी मोठा धक्का देण्याच्या तयारीला लागली आहे. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामारे जाण्याचे संकेत घटक पक्षांकडून दिले जात आहेत. मात्र महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा कोण असेल? यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच संजय राऊत यांनी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, असं म्हटले. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. तशीच स्थिती महायुतीमध्ये देखील आहे. महायुतीत एकनाथ शिंदे की फडणवीस यावर रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात बुलढाण्यातून महायुतीमधील शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी वेगवेगळे दावे केले आहेत.
शिंदेच समोर
बुलढाणा महायुतीतील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच चेहरा समोर करून लढल्या जाणार आहेत. हे मी नाही, यापूर्वी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदेंच असतील. दुसरीकडे ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री, असा फार्मूला असेल अशी प्रतिक्रिया खामगाव येथील महायुतीमधील भाजप आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, पुण्याच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढली जाईल. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढली जाईल. आणि शेवटी संख्या बळाचा विषय असतो. ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल असा.’
एकंदरीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात याच मुद्यावरून दोन्ही आघाड्यांमध्ये घमासान पाहावयास मिळणार आहे.