Social Media Post : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. संचालकांनी चक्क सोशल मीडियावर जमा खर्च टाकल्याची घटना घडली आहे. संचालक मंडळ आणि सचिव यांच्यात काही दिवसापासून प्रशासकीय व आर्थिक व्यवहाराच्या कार्यभारावरून एकसूत्रता नव्हती. सभापती यांनी तातडीची सभा बोलावून चक्क सचिवांच्या कक्षाला कुलूप लावले. त्याच दिवशी सचिवांकडील प्रशासकीय तसेच आर्थिक व्यवहाराचा पदभार काढण्यात आला.
सचिव, सभापती तसेच संचालक प्रमोद प्रधान यांची विविध विषयांना धरून जिल्हा उपनिबंधक कार्यालय भंडारा यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र या तीनही तक्रारींची चौकशी करण्यासाठी अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याने सभापती संचालक आणि सचिव वाद कायम आहे. त्यातच अचानक सोशल मीडियावर लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमा खर्चाचे पत्रक संचालक प्रमोद प्रधान यांनी टाकल्याने बाजार समितीच्या गैरव्यवहाराचा बिगुल वाजल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
मोठा भ्रष्टाचार
लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर डॉ. सुरेश ब्राह्मणकर सभापतिपदी निवड होताच ‘डॉक्टर दुरुस्त करणार बाजार समितीला’ अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र अवघ्या दीड वर्षातच सचिव आणि सभापती यांच्यात प्रशासकीय व आर्थिक व्यवहाराच्या कार्यभारवरून फारसी एकसूत्रता नसल्याचे सध्याच्या वादावरून दिसून येत आहे. निर्माण झालेला वाद एवढ्यावर थांबला नाही. सचिवांच्या कक्षाला कुलूप लावून त्यांचे अधिकार सुद्धा कमी करण्यात आले. गेले दीड महिना हा कक्ष कुलूपबंद आहे. सचिवाचा कक्ष बघून संचालक प्रमोद प्रधान यांनी चक्क बाजार समितीचे जमा खर्च पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केले.
त्यांनी स्वतःच संचालक असलेल्या बाजार समितीत मोठा गैरव्यवहार होत असल्याचे जाहीर केले. संबंध प्रकरणाची आता जिल्हा उपनिबंधक चौकशी करतील का? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्माण झालेल्या वादाची दखल घेत तक्रारीची मालिका संपवतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमसभा अधांतरी
लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण आमसभा 28 सप्टेंबरला होणार आहे. सभापती आणि सचिव यांच्या वादामुळे अनेक विषयासह जमा खर्च सोशल मीडियावर जाहीर झाला. त्यामुळे अनेकांच्या मनात बाजार समितीच्या कारभाराविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. बाजार समितीचा प्रशासकीय कारभार ढासळला आहे. त्यामुळे व्यापारी, दलाल, अडते, हमाल आणि शेतकरी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत विविध विषयावर प्रश्नाचा भडिमार होईल. आमसभा गाजणार असल्याचे संकेत आहेत. 28 सप्टेंबरला सभा होणार की नाही,याची उत्सुकता आहे.