Uddhav Thackeray : जागा वाटपात विदर्भातील जागांबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे अडवणूक करीत असल्याचा आरोप आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाना पटोले यांची तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी (18 ऑक्टोबर) प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना अधिकार नसतील तर राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी लागेल, असे ते म्हणाले होते. त्यामुळे जागा वाटपावर चर्चा सुरू असताना काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.
संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जागा वाटपाबाबत नाना पटोले यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडलाही कळविण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनंही नाना पटोले अडवणूक करीत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांनी थेट रमेश चेन्निथला यांच्याशी संपर्क साधला. चेन्निथला हे वंचित आघाडीच्या बाजूने होते. मात्र अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश महाविकास आघाडीत झालाच नाही. अशातच आता पुन्हा नाना पटोले यांच्यावरही आरोप होत आहेत.
आधीच बिघाडी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याच्या आधीच महाविकास आघाडीमधील वाद आता विकोपाला पोहोचल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागा वाटपाच्या चर्चेला उपस्थित असतील तर ठाकरे गट चर्चेला येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडलाही कळविण्यात आलं आहे. नाना पटोले हे चर्चेदरम्यान अरेरावी करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळं त्यांची तक्रार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर नाना पटोले अडून बसले आहेत. काहीही झालं तरी या जागा सोडणार नाही, अशी पटोले यांची भूमिका आहे. याबाबत शिवसेनेने शरद पवार यांच्याकडेही तक्रार केली आहे. विधानसभा निडणुकांच्या अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना या जागांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा, असा प्रयत्न आहे. मात्र, नाना पटोले यांची भूमिका अडचणी वाढविणारी आहे. त्यामुळे पटोले यांच्याऐवजी काँग्रेस हायकमांडने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीत ज्या पक्षाच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असा फार्मूला ठरला आहे. त्यामुळे सहाजिकच काँग्रेसला जास्त जागा हव्या आहेत. त्यातच नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने ते अडवणूक करीत असल्याचा आरोप आता होत आहे.