Maharashtra Congress : वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत युती होऊ शकली नाही. ‘वंचित’चे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तसे भरपूर केलेत. मात्र त्यांना यश प्राप्त झाले नाही. शिवाय ॲड.आंबेडकर यांनी काँग्रेससाठी काही ठिकाणी पाठिंबा घोषित केलेला आहे. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी किंवा काँग्रेसकडून कुठलाही उमेदवार देऊ नये, अशी विनंती बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे तीनदा आमदार राहिलेले काँग्रेस नेते दिलीपकुमार सानंदा यांनी केली आहे. यासाठी सानंदा यांनी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षातील उच्चपदस्थ पक्षश्रेष्ठींनी या आशयाचे भावनिक पत्र लिहले आहे. त्यामुळे आता काँग्रेस या पत्राची कशी दखल घेईल हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे.
निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटल्यानंतर मविआसोबतच्या युतीची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे ॲड. आंबेडकर यांनी इतर पर्यायांची चाचपणी सुरू केली असताना काँग्रेसकडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अशातच खामगावचे माजी आमदार तथा काँग्रेस नेते दिलीपकुमार सानंदा यांनी भावनिक पत्र पाठवून आपल्या भावना काँग्रेस पक्षातील पक्षश्रेष्ठींनी पत्राद्वारे कळवल्या आहेत. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी अकोला लोकसभा मतदार संघामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला पाहिजे, याशिवाय ‘वंचित’ला (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यावे. वंचितला महाविकास आघडीमध्ये सामील करण्याबाबत पत्रातून केली विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.
काय म्हटले आहे पत्रात
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने बोलविलेल्या प्रत्येक बैठकीत ते आले किंवा त्यांचे प्रतिनिधी आले आहेत. मुंबई येथील श्री शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये देखील त्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीमधील सदस्यांची महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची मनापासून इच्छा होती. म्हणून त्यांनी स्पष्ट मनाने म्हटल होते की, महाविकास आघाडीचे जे घटक आहेत त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्ष यांनी पहिले त्यांच्या जागेचे वाटप करावे व त्यामधून किती जागा देवू शकतो याबाबत त्यांची मागणी होती.
27 मार्च 2024 पर्यंत महाविकास आघाडीने सांगावे. त्यानंतर ‘वंचित’ भूमिका जाहीर करेल. त्यानुसार त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पहिल्या टप्प्यामधील उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी कोल्हापूर लोकसभा व नागपूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी पाठींबा दिला आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणून अकोला लोकसभा मतदार संघामध्ये प्रकाश आंबेडकर यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला पाहिजे, अशी सर्व काँग्रेस श्रेष्ठींना कळकळीची विनंती आहे.