Shevgaon Constituency : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांनी यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शेवगावमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जासह त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील नोंदींवरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दिलीप खेडकर यांनी या प्रतिज्ञापत्रात विवाहित नसल्याची नोंद केली आहे. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा दिलीप खेडकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खेडकर यांनी विवाहित असल्याचे नमूद केले होते. यावेळी खेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते.
तपशील नाही
खेडकर यांनी यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या उत्पन्नाचा तपशील लिहिलेल्या रकान्यात स्वत:च्या नावापुढे गेल्या पाच वर्षांत त्यांनी सादर केलेल्या आयकर विवरण पत्रातील उत्पन्नाचा उल्लेख आहे. पत्नीच्या रकान्यात कुणाचंही नाव नसून उत्पन्नाच्या रकान्यांमध्ये ‘लागू नाही’ असा उल्लेख करण्यात आला आहे. अवलंबून असणाऱ्या व्यक्तींच्या रकान्यातही ‘लागू नाही’ असाच उल्लेख करण्यात आला आहे. लोकसभेवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी मनोरमा यांच्याबाबतचा तपशील दिला होता.
पुजामुळे अडचण
दिलीप खेडकर हे यापूर्वी सनदी अधिकारी होते. त्यांची मुलगी पूजा खेडकर ही देखील सनदी अधिकारी झाली होती. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत पूजाने आयएएस पद मिळवले होते. परंतु पुण्यात पूजा आणि दिलीप खेडकर यांनी निर्माण केलेल्या वादग्रस्त परिस्थितीनंतर पूजा अडचणीत आली. याप्रकरणी थेट पंतप्रधान कार्यालयाने चौकशी लावली. त्यानंतर संघ लोकसेवा आयोगानेही पूजा खेडकरच्या आयएएस होण्याबाबत तपासाला सुरुवात केली. तपासात पुजाने बनवेगिरी केल्याचे पुरावे आढळल्याने यूपीएससीने तिला बडतर्फ केले. याप्रकरणी पुजाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत पुजाचे वडील दिलीप खेडकर यांनी प्रतिज्ञापत्रात पत्नी आणि मुलीचे नाव नमूद न केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Pooja Khedkar. : ‘सरकारने मला बोलण्याची परवानगी दिलेली नाही’
घटस्फोटासाठी अर्ज केला
दिलीप खेडकर व पत्नी मनोरमा खेडकर यांनी 2009 मध्ये न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. 2010 मध्ये त्यांचा घटस्फोट मंजूरही झाला होता. पूजा खेडकर यांनी त्यांच्या ‘मॉक इंटरव्यू’मध्ये आई-वडील वेगळे राहात असल्याचा उल्लेख केला होता. पण दिलीप खेडकर यांनी मात्र 2019 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला होता. आता सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा त्यांनी ‘पत्नी’ या रकान्यात ‘लागू नाही’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे पूजा खेडकरच नव्हे तर संपूर्ण खेडकर कुटुंबाबद्दल नेमकं चाललय तरी काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.