UPSC Scam : वादग्रस्त माजी सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील तथा राज्याचे माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप खेडकर यांनी गंभीर आरोप केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी बोट दाखविले आहे. मुलगी पूजा खेडकरवर करण्यात आलेले आरोप खरे नाहीत. पुजाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आपल्या मुलीला जो त्रास झाला तो आपल्यामुळे झाला. प्रस्थापिताना आपण निवडणूक लढू नये, असे वाटत होते. या नेत्यांनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला. दिलीप खेडकर म्हणाले की, विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होत. त्यांच्याकडे महसूल खाते आहे. त्यामुळे त्यांनी अधिकार्यांवर प्रभाव टाकला. आम्हाला न्याय मिळायला हवा होता. तो मिळाला नसल्याचा आरोपही खेडकर यांनी केला.
शासकीय सेवेतून बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिरापी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. खेडकर यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना या आरोपांबद्दल पुन्हा वाच्यता केली. त्यांनी आपल्या मुलीवर झालेले आरोप खोटे असल्याचं स्पष्ट केलं. आपल्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल असल्याने दबाव होता. त्यामुळे आपण इतके दिवस समोर येऊ शकलो नाही.
चुकीची माहिती
पूजा खेडकर बाबतीत जी माहिती दिली गेली ती वस्तुस्थितीला धरून नाही. तिच्या बाबतीत एक फ्रॉड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती गेली. ती माहिती चुकीची आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्थ झाले आहे. या सर्वांमध्ये राजकारण आडवं आल्याचे त्यांनी सांगितले. आपण राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखेंविरोधात अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवली. त्यामुळे मुलगी पूजा खेडकरची बदनामी करण्यात आली. आपण माजी प्रशासकीय अधिकारी होतो. आपल्याला त्रास देण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे दिलीप खेडकर यांनी दिल्लीत (Delhi) पत्रकार परिषदेत केला.
संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) पुजावर नाव बदलल्याचा आरोप केला. पण तिने नाव बदलले नाही. युपीएससीने कोणाच्यातरी दबावाखाली ही कारवाई केली आहे. पूजा खेडकर ही वंजारी आहे. तिचे ओबीसी प्रमाणपत्र खोटं नाही. त्या वर्गवारीत जे ॲटम्प्ट दिले, ते योग्य आहेत. पर्सन विथ बेंच मार्कमध्ये 30 ते 40 आजार आहेत. ॲाम्लोपिया हा आजार पुजाला आहे. पीएच वर्गवारीत हा आजार 2018 मध्ये आला. दोन्ही वर्गवारीचे ॲटम्प्ट वेगवेगळे आहेत, असा दावा दिलीप खेडकर यांनी केला.
‘वंचित’चे उमेदवार
पूजा खेडकर प्रकरणात त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी आहेत. पाथर्डी तालुक्यातील भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. बी. ई. (मेकॅनिकल) शिक्षण झालेले दिलीप खेडकर यांनी राज्य सरकारमधील अनेक पदांवर काम केलं आहे. दिलीप खेडकर सेवानिवृत्त होताच त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना 13 हजार 749 मते मिळाली होती.
दिलीप खेडकर यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांनी देखील लोकसभा निवडणूक अर्ज भरला होता. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या. मनोरमा खेडकर यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील सनदी अधिकारी होते. त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली होती. त्यांचेही एकदा निलंबनही झाले होते. पुजाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मनोरमा यांचाही धमकीचा एक व्हिडीओ पुढे आला होता.
पुजाला वारंवार बोलावल्यानंतरही ती मेडिकल टीमसमोर हजर झाली नव्हती. याशिवाय खासगी कारवार महाराष्ट्र शासन लिहिल्याचा आणि त्यावर विना परवानगी अंबर दिवे लावल्याचा आरोप तिच्यावर सिद्ध झाला आहे. त्यामुळेच पुजाने दंड भरला आहे. पुजाने जो पत्ता युपीएससीला दिला आणि ऑडी कारचा जो पत्ता आहे तो देखील सारखाच आहे. त्या पत्त्यावर पुजाचे घर नाही. पुजाला वैद्यकीय प्रमाणपत्र दिले नसल्याचे वैद्यकीय यंत्रणेने सांगितले आहे. त्यामुळे एकूणच पुजाचे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. दिलीप खेडकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य असू शकते. विखे पाटलांचा दिलीप खेडकर यांच्यावर राग असू शकतो. परंतु कागदोपत्री पुराव्या आधारावर युपीएससीने कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
पुजा आणि पुजाचे आई-वडिल कितीही आरोप-प्रत्यारोप करीत असले तरी आता हे प्रकरण दिल्लीच्या उच्च न्यायालयात (Delhi High Court) समोर सुनावणीला आहे. त्यामुळे कोर्ट कोणत्याही आरोप-प्रत्यारोपाच्या आधारे निकाल नक्कीच देणार नाही. वस्तुस्थिती जन्य पुराव्यांच्या आधारावर या खटल्याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे पुजाचे आयएएस (IAS) पद कायम राहणार की बनवेगिरी केल्याने तिला शिक्षा मिळणार, हे लवकरच सिद्ध होणार आहे.