Cabinet : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या निकटचे सहकारी मानले जातात. यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. पण मंत्रिमंडळात त्यांचा समावेश न झाल्याने नगर जिल्ह्यातील नागरिक, त्यातल्या त्यात युवा वर्ग कमालीचा नाराज आहे.
संग्राम जगताप हे युवांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. युवकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यांना मंत्रिपद मिळण्याचे जवळपास निश्चित होते. त्यामुळे शपथविधी कार्यक्रमासाठी त्यांच्या समर्थकांनी नगरवरून कुचही केली होती. पण नंतर त्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार नाही, असे कळल्यावर कार्यकर्ते माघारी फिरले आणि प्रचंड नाराजी व्यक्त केली. संग्राम जगताप यांनी लहान वयात विद्यार्थी दशेतच आपल्या राजकारणाला आणि समाजकारणाला सुरुवात केली. वयाच्या 23व्या वर्षी ते नगर महानगरपालिकेचे महापौर झाले. नंतरच्या टर्ममध्ये 28व्या वर्षीही त्यांनी महापौरपद भूषवले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली.
सुसंस्कृत आणि सुस्वभावी
पहिल्याच प्रयत्नात ते आमदार झाले त्यानंतर 2019 व यावेळी 2024 मध्येही ते प्रचंड मताधिक्य घेऊन आमदार झाले. वयाच्या 38 व्या वर्षी दोन वेळा महापौर आणि तीन वेळा आमदार होण्याचा मान त्यांनी पटकावला. आमदारकीची ही तिसरी टर्म असल्यामुळे त्यांना यावेळी मंत्रिपद निश्चितपणे मिळेलस अशी केवळ चर्चाच नाही तर पक्की खात्री होती. पण ऐनवेळी अचानक त्यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीतून कमी झाले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना चांगलाच धक्का बसला. पण सुसंस्कृत आणि सुस्वभावी असलेल्या संग्राम जगतापनी कुठेही विरोध केला नाही की त्यांचे समर्थक कार्यकर्ते आक्रमकही झाले नाहीत. पक्षाचा निर्णय त्यांनी शिरसावंद्य मानला.
Assembly Winter session : फडणवीस, शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कुणी केला प्रयत्न ?
सुनील तटकरेंमुळे हुकले मंत्रिपद ?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हापासून सुनील तटकरे आणि परिवार सर्वात मोठा लाभार्थी ठरला आहे. अजित पवार यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन वेगळी वाट धरली आणि भाजपसोबत हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री बनले. आता पुन्हा सत्तेत आले आणि उपमुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळसुद्धा अजित दादांना मिळाले. याही परिस्थितीत सुनील तटकरे आणि परिवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात मोठा लाभार्थी ठरला आहे.
सुनील तटकरे खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा अनिकेत आमदार आहेस मुलगी अदिती यांचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तटकरे परिवार सर्वात मोठा लाभार्थी असल्याची टीका आता होऊ लागली आहे. पक्षाध्यक्ष कुणीही असो (शरद पवार की अजित पवार) पण पदे घेण्यात तटकरे परिवार नेहमी आघाडीवर असतो. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्ष पातळीवरील निर्णयांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. नगर जिल्ह्याला मंत्रिपद द्यायचे नाही असा निर्णय त्यांनीच घेतला असल्याचे सूत्र सांगतात. सूत्रांची माहिती खरी मानली तर सुनील तटकरे यांच्यामुळेच संग्राम जगताप यांचे मंत्रीपद हुकले, असे म्हणता येईल.
दादांच्या गळ्यातला ताईत..
आमदार संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या गळ्यातला ताईत मानले जातात, असे असताना त्यांना मंत्रिपद न मिळणे, हे अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेले. पक्षशिस्त पाळणारे नेते म्हणून जगतापांचे नाव घेतले जाते. लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. तरीही पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि केवळ पंधरा दिवसांच्या तयारीत पाच लाखांवर मते त्यांनी घेतली. निवडणूक कुठलीही असो पण विजय हमखास मिळवायचा, अशी त्यांची ख्याती तयार झाली आहे. विजयाची श्रृंखला तयार करणाऱ्या संग्राम जगतापांना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे अनेकांची नाराजी आहे.